लोकांनी जास्तीत जास्त गुंतवणूक करावी म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) वेगवेगळ्या गुंतवणूक योजना घेऊन येत असते. त्यापैकीच एक योजना म्हणजे ‘एसबीआय अमृत कलश फिक्स्ड डिपॉझिट योजना’ (SBI Amrut Kalash Fixed Deposit Scheme). 400 दिवसांचा मुदत कालावधी असणारी ही योजना गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. ही योजना बँकेने 15 फेब्रुवारी 2023 रोजी सुरू केली होती. ज्यामध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2023 पर्यंत मर्यादित होती. पण स्टेट बॅंकेने या योजनेतील गुंतवणूक कालावधी वाढवला आहे. तुम्ही देखील या योजनेत गुंतवणूक करून जास्तीत जास्त परतावा मिळवू शकता.
'या' तारखेपर्यंत करता येणार गुंतवणूक
ग्राहकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) पुन्हा एकदा ‘एसबीआय अमृत कलश फिक्स्ड डिपॉझिट योजना’ (SBI Amrut Kalash Fixed Deposit Scheme) सुरू केली. 12 एप्रिल 2023 पासून ही योजना बँकेने सुरू केली असून ती 30 जून 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुली राहणार आहे. या एफडी योजनेत सर्वसामान्य ग्राहकांना 7.10 टक्के व्याजदर दिला जात आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याजदर दिला जात आहे. याशिवाय बँकेच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना 1 टक्के अधिक व्याजदर दिला जात आहे. या योजनेत जास्तीत जास्त 400 दिवसांपर्यंत गुंतवणूक करता येते.
एसबीआय अमृत कलश फिक्स्ड डिपॉझिट योजनेतील व्याजदर (Interest Rate) हा मासिक, त्रैमासिक आणि वार्षिक आधारावर ग्राहकांना दिला जातो. इन्कम टॅक्स कायद्यातील नियमानुसार ज्यावेळी ग्राहकांच्या मुदत ठेवीचा कालावधी पूर्ण होतो. त्यावेळी त्यावरील टीडीएस (TDS) कापून उर्वरित रक्कम ग्राहकांना दिली जाते.
या योजनेत कोण गुंतवणूक करू शकतो?
ज्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे किमान 1 ते 2 वर्षासाठी गुंतवायचे आहेत; अशा लोकांसाठी ही योजना फायद्याची ठरू शकते. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक व्याजदर दिला जात आहे. एसबीआय अमृत कलश योजनेत गुंतवणूक करण्यासाठी भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे. 19 वर्षावरील कोणतीही व्यक्ती बँकेत खाते उघडून या योजनेचा लाभ घेऊ शकते. सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, बँकेचे कर्मचारी आणि पेन्शनधारक या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
(डिसक्लेमर: महामनी' कोणत्याही गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. वाचकांनी गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी सेबी नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.)