एसबीआयच्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी आली आहे. तुम्ही जर SBI बँकेचे कर्ज घेतले असेल आणि कर्जाचे हफ्ते भरत असाल तर येत्या काही दिवसांत तुमच्या खिशाला आणखी झळ पोहोचणार आहे. याचे कारण म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड आधारित व्याजदर म्हणजेच MCLR 0.05 टक्क्यांनी वाढवला आहे.
स्टेट बँकेने याबाबत एक निवेदन जारी करत त्यांच्या ग्राहकांना माहिती दिली आहे. तसेच बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर देखील वाढलेल्या व्याजदराबाबत माहिती देण्यात आली आहे. MCLR वाढीनंतर सर्व प्रकारच्या कर्जांचे व्याजदर वाढणार आहेत. यात होम लोन, पर्सनल लोन, वाहन लोन, शैक्षणिक लोन इत्यादींचा समावेश आहे.
MCLR किती वाढला आहे?
एसबीआयच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, MCLR दरातील नवे बदल येत्या 15 जुलैपासून लागू करण्यात येणार आहे. बँकेने 8.50 टक्के असलेले MCLR दर एका वर्षासाठी 8.55 टक्के केले आहेत. MCLR दर ग्राहकाने घेतलेल्या कर्जाच्या रकमेवर आणि कालावधीवर अवलंबून असतो. त्यामुळेच आर्व ग्राहकांना एकसमान व्याजदर दिला जात नाही. प्रत्येक ग्राहकाच्या बाबतीत वेगवेगळे निकष यात लागू होतात.
स्टेट बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ज्या कर्जदारांनी मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड आधारित व्याजदर (MCLR) वर कर्ज घेतले आहे त्यांचा मासिक हप्ता (EMI) वाढणार आहे. इतर कर्जदारांवर याचा परिणाम पडणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.
MCLR म्हणजे काय?
MCLR म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट. प्रत्येक बँक त्यांच्या एकूण आर्थिक उलाढालीचा विचार करून, तसेच नफा, तोटा, परिचालन खर्च या सगळ्यांचा विचार करून त्याचा किमान व्याजदर ठरवते. विविध कर्जावरील व्याजदराची गणना करण्यासाठी वेगवगेळ्या बँका लेंडिंग रेट ठरवतात.
बँक तिच्या निधीची किंमत, ऑपरेटिंग कॉस्ट आणि नफा मार्जिन यासारख्या घटकांचा विचार करून त्याचा किमान व्याज दर ठरवते. गृहकर्जासह विविध कर्जावरील व्याजदराची गणना करण्यासाठी बँका MCLR वापरतात.