लहान मुले ही अनुकरणप्रिय असतात असं म्हणतात. आपल्या पालकांकडे पाहून ते अनेक गोष्टी शिकत असतात. विशेषतः आईकडून मुलांना बचतीची शिकवण मिळते. आपण अशा काही महिला उद्योजकांशी बोलणार आहोत ज्यांनी आपल्या आईकडून बचतीचे तसेच आर्थिक धडे घेतले. त्यापैकी काही (माता) गृहिणी होत्या तर काही होत्या वर्किंग वुमन. खर्च आणि बचतीचा योग्य मेळ राखणे, कर्जाऊ रकमेबाबत सावधानता बाळगणे आणि प्रत्येक गोष्टीचे मूल्य ओळखणे अशा अनेक गोष्टी त्यांनी कळत-नकळत शिकवल्या.
त्यापैकी 5 महत्वाच्या शिकवणींचा आपण आढावा घेऊया.
1. उत्पन्न कितीही असो, नियमित बचत करा
ही शिकवण पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. अंथरूण पाहून पाय पसरा आणि त्यातही बचतीचा मार्ग शोधा. महिन्याच्या शेवटी पैसे अपुरे पडायला लागले की आईने साठवलेले आपत्कालीन निधीतील पैसे उपयोगी पडायचे, अशी आठवण शांती एकंबराम यांनी सांगितली. प्रत्येक मध्यमवर्गीय घरात असा निधी असायचाच. गरजेच्या वेळेस उपयोगी पडावे म्हणून आई छोटी छोटी रक्कम साठवून ठेवायची, ते पाहून मला SIP आठवते, असंही एकंबराम म्हणाल्या.
राधिका गुप्ता यांनी तर आपल्या आईच्या या आपत्कालीन निधीचे 'गुप्त धन' असेच नाव ठेवले आहे. मर्यदित खर्चातही (गरजेच्या वेळेसाठी) ठराविक रक्कम साठवता येते याचीच शिकवण मिळते असे गुप्ता म्हणाल्या. मिळेल त्या पैशात नेमक्या गरजा भागवता येतात आणि नेटाने घर चालवता येते हा धडा मी आईकडूनच शिकले असं शैलजा दत्त सांगतात. मी एक सधन कुटुंबातील असले तरीही आई-वडील विभक्त झाल्यावर आमच्याकडे फुटकी कवडीही नव्हती. घरातूनच छोटा उद्योग चालवत, तुटपुंज्या रकमेत तीन मुलांना वाढवत आईने काटकसरीने संसार केला, असे त्या म्हणाल्या.
2. कर्ज घेताना सावध रहा
कर्ज काढून सण साजरे करायचे नाहीत. सर्व महिलांच्या सांगण्यानुसार, त्यांची आई कर्ज घेण्यास कधीही अनुकूल नसायची. दत्त यांच्या म्हणण्यानुसार, कर्ज हे त्यांच्या आईच्या काळजीचे मुख्य कारण होते. त्यामुळेच दत्त आता कर्ज घेणे कटाक्षाने टाळतात. आर्थिक संबंधात कोणालाही उत्तर देण्यास बांधील नसावे अशीच शिकवण सुप्रिया पॉल यांच्या आईने त्यांना दिली.
3. आर्थिक स्वावलंबन महत्वाचे
आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणे आणि आपल्या पैशासाठी जबाबदार असणे हा एक महत्त्वाचा धडा मी आईकडून शिकले, असे राधिका गुप्ता म्हणाल्या. आर्थिकदृष्ट्या साक्षर असणे आणि स्वत: च्या पैशाच्या बाबींची सक्षमपणे काळजी घेणे हाही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असण्याचा एक महत्वाचा भाग आहे. घरातील पैशांचे व्यवस्थापन करत असूनही अनेक स्त्रिया स्वत:साठी आणि घरासाठी पैशाचे निर्णय घेण्यास टाळाटाळ करताना दिसतात. स्वत:च्या पैशांचे व्यवस्थापन करायला शिकल्यास कोणावरही अवलंबून रहावे लागणार नाही, असे शैलजा दत्त म्हणाल्या. ‘शिक्षण’, ‘आर्थिक स्वातंत्र्य’ आणि ‘आर्थिक साक्षरता’ हे महिला सबलीकरणाचे तीन महत्वपूर्ण स्तंभ आहेत, असे मत एकंबराम यांनी नोंदवले.
4. भविष्याचे नियोजन करून हुशारीने खर्च करा
ज्या गोष्टीसाठी पैसे मोजणार आहोत, त्याचे मूल्य नीट ओळखले पाहिजे हे मी आईकडून शिकले असे पॉल म्हणाल्या. उद्योगातही सगळ्यात चांगली डील कशी मिळेल यावर माझा कटाक्ष असतो, असे त्यांनी स्पष्ट केले. भविष्याचे काटेकोरपणे नियोजन करून त्याप्रमाणेच खर्च करण्याची आणि अनावश्यक वस्तूंवर एकही पै खर्च न करण्याची सवय आईमुळे लागल्याचेही पॉल यांनी नमूद केले.
भविष्यातील खर्चाचे योग्य नियोजन, बचत आणि खर्चही ताळेबंद मांडणे या मध्यमवर्गीय सवयी मी अजूनही सोडल्या नाहीत असे एकंबराम यांनी सांगितले. (पैशांचे) योग्य व काटेकोर नियोजन केल्यास आपत्कालीन स्थितीतही निभाव लागू शकतो . कोणताही वायफळ खर्च करण्यापूर्वी बचतीसाठी पैसे राखून ठेवणे अतिशय महत्वाचे असते, असा सल्लाही एकंबराम यांनी दिला.
5. आहे त्यात भागवायला शिका
हाती येणाऱ्या (तुटपुंज्या) रकमेत घरखर्च भागवण्याचे काम स्त्रिया कौशल्याने करतात. वडिलांच्या फिरतीच्या नोकरीमुळे देश-विदेशात फिरावे लागे. आईला दरवेळी नव्याने (संसाराची) सुरुवात करावी लागत असे, आहे त्या पैशात भागवावे लागे. नव्या देशातील नवीन चलन, त्याचे मूल्य समजून घेऊन त्याप्रमाणे बजेट आखावे लागे, असे गुप्ता यांनी नमूद केले.
तर मिळेल त्या रकमेत आई घरखर्च कसा भागवायची याचे एकंबराम यांना कौतुक वाटते. 'उद्योग असो किंवा पैसे - आहे त्यात भागवायला शिका ' हेच तिच्याकडून शिकायला मिळाल्याचे त्या नमूद करतात.