Russian crude oil Import: जानेवारी महिन्यात भारताने रशियन क्रूड तेल आयातीचा उच्चांक गाठला आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे युरोपीन देश आणि अमेरिकेने रशियन तेलाच्या किंमतीवर मर्यादा घातली असली तरी याचा परिणाम भारताच्या आयातीवर तिळमात्रही झाला नाही. जानेवारी महिन्यात प्रति दिन भारताने 12 लाख 70 हजार पिंप (बॅरल) कच्चे तेल आयात केले. हे प्रमाण मागील वर्षीच्या डिसेंबरमधील आयातीपेक्षा 6% जास्त आहे.
रशिया सर्वात मोठा कच्चे तेल पुरवठादार
मागील सलग चार महिने भारताने रशियाकडून सर्वाधिक कच्चे तेल आयात केले आहे. यापूर्वी मध्य पूर्वेतील देशांकडून भारत प्रामुख्याने कच्चे तेल आयात करत होता. मात्र, रशियाने भारताला स्वस्तात तेल देण्यास सुरुवात केल्याने इतर देशांच्या विरोधाला झुगारुन भारताने आयात सुरू ठेवली आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना अनेक आंतरराष्ट्रीय मंचावर याबाबत प्रश्न विचारण्यात आले. मात्र, भारताने रशियाकडून तेल आयातीची ठाम भूमिका घेतली आहे.
युरोपीयन प्राइस कॅपचा भारतावर परिणाम नाही
भारताची इंधनाची गरज दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे आयातीचे प्रमाणही वाढत आहे. इराक, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात या देशांकडूनही भारत मोठ्या प्रमाणावर तेल आयात करतो. 5 डिसेंबर रोजी युरोपीयन देशांनी रशियन तेलावर किंमतीची मर्यादा घातली होती. त्यानंतर भारताला होणाऱ्या तेलाच्या पुरवठ्यात अडथळा येण्याची शक्यता होती. मात्र, तसे झाले नाही.
देशांतर्गत इंधनाचे दर जास्तच -
भारताला स्वस्तात कच्चे तेल मिळत असले तरी देशांतर्गत तेलाच्या किंमती जास्तच आहेत. दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि एक लिटर डिझेल 89.62 रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि एक लिटर डिझेल 92.76 रुपये दराने विकले जात आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत 106.31 रुपये आणि डिझेलची किंमत 94.27 रुपये आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे. कच्चे तेल जरी स्वस्त मिळत असले तर कर आणि सरचार्ज यामुळे तेलाच्या किंमती वाढतात. त्याचा परिणाम थेट ग्राहकांवर होतो.
रशिया-युक्रेन युद्धापूर्वी भारत 60% तेल मध्य पूर्वेतील देशांकडून आयात करत असे. तर 14% तेल उत्तर अमेरिकेतून आणि आफ्रिकन देशांतून 12% तेल आयात व्हायचं. भारतीय आयातीतला रशियाचा वाटा फक्त 2% इतका होता. पण, जून 2022 पासून हा हिस्सा वाढून सर्वाधिक म्हणजे 25% ज्या पुढे गेले आहे.