राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजेच NPS मधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. मात्र, हा बदल फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू असेल खासगी क्षेत्रातील NPS खातेधारक कर्मचाऱ्यांसाठी नवे नियम लागू असणार नाहीत. स्वयंघोषित (सेल्फ डिक्लरेशन) पद्धतीने अर्ज करुन पेन्शन फंडातील रक्कम केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्वायत्त संस्थातील कर्मचाऱ्यांना काढता येणार नाही. कोरोना काळात कर्मचाऱ्यांची आर्थिक गैरसोय होऊ नये म्हणून नियमांमध्ये काही सूट दिली होती, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता ही सुविधा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बंद केली आहे.
पेन्शन फंड रेग्युरेटरी आणि डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने एक पत्रक जारी करून या निर्णयाची माहिती दिली आहे. मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांना जर फंडातील रक्कम काढायची असेल तर नोडल ऑफिसद्वारे अर्ज करण्याचा नियम अनिवार्य केला आहे. अनेक राज्ये जुनी पेन्शन योजना सुरू करण्याच्या तयारीत आहेत. काही राज्यांनी PFRDA ला कर्मचाऱ्यांच्या फंडाची रक्कम मागितली आहे. त्यामुळे हा नियमांत बदल केला आहे.
कधी सूट दिली होती?
जानेवारी 2021 मध्ये कोरोना देशभर पसरला होता त्यावेळी PFRDA ने पत्रक जारी करत सेल्फ डिक्लरेशनद्वारे फंडातील रक्कम कर्मचाऱ्यांना काढता येईल, असे सांगितले होते. कारण, नोडल कार्यालयांकडे मोठ्या प्रमाणात अर्ज येत होते. या कार्यालयांवरील ताण कमी करण्यासाठी सेल्फ डिक्लेरेशनची सुविधा सुरू करण्यात आली होती. कर्मचाऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यावर तत्काळ कार्यवाही करून बँक खाते पडताळून फंडातील पैसे देण्याची सुविधा होती. यासाठी नोडल कार्यालयाची परवानगी आवश्यक नव्हती. कारण, कोरोना निर्बंधामुळे नागरिकांना घराबाहेर पडता येत नव्हते. मात्र, ही सुविधा आता बंद करण्यात आली आहे.
बिनसरकारी कर्मचाऱ्यांसाठी नियम काय?
खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची सुद्धा NPS खाती आहेत. मात्र, त्यांना फंडातून पैसे काढण्यासाठी सेल्फ डिक्लेरेशनची सुविधा तशीच ठेवण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिक आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचारी यांच्या नियमांमध्ये कोणताही बदल केला नाही.