Union Budget 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन(Nirmala Sitharaman) यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात सामाजिक पायाभूत सुविधांसाठी(Social Infrastructure) विशेष तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे, रस्ते, विमान सुविधा यासारख्या सामाजिक पायाभूत सुविधांसाठी 10 लाख कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. यामुळे देशातील प्रत्येक शहरामध्ये सामाजिक पायाभूत सुविधांचा विकास होईल असे अर्थमंत्र्यांचे मत आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
देशांतर्गत विमानसेवेला चालना देणार
भारतातील सामाजिक पायाभूत सुविधांचा विकास व्हावा यासाठी 10 लाख कोटींची विशेष तरतूद करण्यात येणार आहे. ही तरतूद एकूण जीडीपीच्या(GDP) 3.3 टक्के असणार आहे. यासाठी केंद्राकडून राज्य सरकारला वेगवेगळ्या स्तरावर मदत करण्यात येईल. देशांतर्गत विमानसेवा वाढवण्यासाठी व त्याला चालना देण्यासाठी 50 नवीन विमानतळ भारतामध्ये उभारण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे. सामाजिक सुविधांच्या विकासासाठी 'अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर फंड(Urban Infrastructure Fund)' तयार करण्यात येईल. या फंडाचा वापर करून शहरांनी सामाजिक पायाभूत सुविधांचा विकास करावा असेही त्या म्हणाल्या. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सामाजिक पायाभूत सुविधांसाठीचा निधी हा वाढवल्याचे त्यांनी सांगितले आहे.
रेल्वेतील नवीन योजनांसाठी 75 हजार कोटींची घोषणा
अमृतकाळातील या पहिल्याच अर्थसंकल्पात रेल्वेतील नवीन योजनांसाठी 75 हजार कोटींची घोषणा करण्यात आली आहे. 2022-23 मध्ये रेल्वेच्या कायापालटासाठी 2.4 लाख कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तरतूद केली होती. या निधीतून रेल्वेचे नवीन ट्रॅक तयार करणे, हायस्पीड वंदे भारत गाड्यांची संख्या वाढवणे, हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या तसेच अहमदाबाद – मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प सुरु करणे यावर भर देण्यात आला होता.