देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जिओचे आज देशभरात नेटवर्क 29 नोव्हेंबर 2022 पासून ठप्प झाले आहे. व्हॉईस कॉलिंग आणि SMS सेवा खंडीत झाल्याने मुंबईसह विविध शहरातील कोट्यवधी जिओ ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला.जिओ सेवा विस्कळित झाल्याने ग्राहकांनी सोशल मिडियावर कंपनीबाबत नाराजी व्यक्त केली.
डॉउनडिटेक्टर या कंपनीच्या अहवालानुसार आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जिओची सेवा ठप्प झाली.कंपनीच्या ग्राहकांपैकी जवळपास 38% ग्राहकांनी मोबाईलला सिग्नल मिळत नसल्याची तक्रार केली. 37% ग्राहकांना मोबाईलवरुन कॉल करता आले नाहीत तर 26% ग्राहकांनी इंटरनेट सेवा बंद झाल्याची तक्रार केली आहे. अनेकांनी जिओची सेवा खंडित झाल्याबद्दल ट्विट करुन राग व्यक्त केला. काही निवडक शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्यावरुन बहुतांश ग्राहकांनी जिओला ट्रोल केले. ट्विटरवर #Jiodown हा टॉपिक काहीवेळ ट्रेंडिंगमध्ये होता.
मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरु. हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, नागपूर या शहरांमधून नेटवर्क गेल्याच्या तक्रारी ग्राहकांनी केल्याचे दिसून आले.दरम्यान, कंपनीकडून नेटवर्क निर्माण झालेल्या इश्यूबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. साडेतीन ते चार तासांनंतर नेटवर्क पूर्ववत झाले. गेल्या वर्षभरात तीन वेळा अशा जिओचे नेटवर्क ढेपाळले होते. ज्याचा फटका कोट्यवधी युजर्सला बसला होता.
दूरसंचार नियामकाच्या (TRAI) ताज्या आकडेवारीनुसार सप्टेंबर 2022 या महिन्यात रिलायन्स जिओने 14 लाख 20 हजार नवीन ग्राहक जोडले. जिओची एकूण ग्राहक संख्या 38 कोटी 60 लाख इतकी वाढली आहे. याशिवाय कंपनीच्या वायरलेस ग्राहकांमध्ये देखील मोठी वाढ दिसून आली. भारतातील एकूण सक्रिय मोबाईल ग्राहकांची संख्या 114 कोटी 50 लाख इतकी आहे. त्यात जिओचे सर्वाधिक असून त्याखालोखाल व्होडाफोन, भारती एअरटेल या कंपन्यांचा समावेश आहे.