गेल्या काही महिन्यांपासून महागाईचा सामना करणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आली आहे. देशभरातील खाद्यतेलांच्या किमतींत घट झाल्याची माहिती खुद्द केंद्र सरकारने दिली आहे. गेल्या वर्षात रिफाईन सनफ्लॉवर तेल, सोयाबीन आणि पामतेलाच्या किमतीत सातत्याने घट झाली असल्याची माहिती लोकसभेत केंद्र सरकारने दिली आहे. गेल्या वर्षभरात सनफ्लॉवर तेलाच्या किमती 29 टक्क्यांनी, सोयाबीन तेल 19 टक्क्यांनी आणि पाम टेल 25 टक्क्यांनी स्वस्त झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
रशिया-युक्रेन युद्धानंतर वाढले होते दर
फेब्रुवारी 2022 मध्ये रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युध्द सुरु झाले होते. सुर्यफुल तेलाची आयात भारत युक्रेनकडून करत असतो. दरवर्षी 25 लाख टन सुर्यफुल तेलाची आयात भारताकडून होत होती. मात्र युद्धामुळे तेलाची आवक थांबली आणि भारताला अमेरिकन देशांकडे आपला मोर्चा वळवावा लागला होता. परिणामी देशभरात तेलाच्या किमती कमालीच्या महागल्या होत्या. आता मात्र हळूहळू परिस्थिती नियंत्रणात आली असून तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत.
खाद्यतेल का स्वस्त झाले?
सरकारच्या वतीने लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात केंद्र सरकारने याबाबत उत्तर दिले आहे. जागतिक बाजारात आता तेलाच्या किमती स्थिर झाल्या असून त्याचा फायदा भारताला देखील होतो आहे असे सरकारने म्हटले आहे. अन्न आणि ग्राहक व्यवहार राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती (Sadhvi Niranjan Jyoti) यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. देशांतर्गत तेलाच्या किमतींवर सरकारचे बारकाईने लक्ष असून सामान्यांना आर्थिक भार सहन करावा लागू नये यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. याचाच भाग म्हणून अलीकडेच तेलाच्या देशांतर्गत किमती कमी करण्यासाठी सरकारने तेलावरील आयात शुल्क कमी केले असल्याची माहिती त्यांनी दिली.
क्रूड सनफ्लॉवर ऑईल, क्रूड सोयाबीन ऑईल आणि क्रूड पामोलिन ऑईलच्या आंतरराष्ट्रीय किमतीत घसरण झाल्याबरोबरच सरकारने उचललेल्या पावलांमुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.