आयफोनने नुकताच iPhone 15 सेरीजचा स्मार्टफोन लॉंच केलाय. जगभरात या मोबाईलची सध्या चर्चा सुरु आहे. भारतात आयफोनचे मुंबई आणि दिल्लीत रिटेल स्टोअर सुरु झाल्यामुळे मुंबई आणि दिल्लीकरांना हा फोन खरेदी करणे, त्याची बुकिंग करणे सहजशक्य झाले आहे. मात्र मुंबई आणि दिल्लीच्या बाहेर राहणाऱ्या ॲपल प्रेमींना स्मार्टफोन कखरेदी करण्याची संधी मिळणार आहे, तेही लवकरच.
रेडिंग्टन लिमिटेड देणार सेवा
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज अशा रेडिंग्टन लिमिटेड संस्थेने याबद्दल माहिती दिली आहे. संस्थेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ॲपलचे iPhone 15 सेरीज स्मार्टफोन आणि स्मार्ट वॉच देशभरात पोहोचवण्याचे काम रेडिंग्टन लिमिटेड करणार आहे. यासाठी रेडिंग्टन लिमिटेडने HDFC बँकेसोबत भागीदारी केली असल्याची माहिती देखील निवेदनात देण्यात आली आहे.
रेडिंग्टन लिमिटेड काय करते?
Redington Group ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सेवा पुरवणारी एक दिग्गज संस्था आहे. ही कंपनी वेगवगेळ्या ब्रांडचे मोबाइल हँडसेट, मोबाइल ॲ क्सेसरीजचे वितरण देशभरात करण्यास मदत करते. याखेरीज कंपनी माहिती तंत्रज्ञान सेवा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बिग डेटा ॲ नालिटिक्स, 5G कम्युनिकेशन्स, आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट या क्षेत्रातील सेवा आणि उत्पादने ऑफर करणाऱ्या कंपन्यांची एक संस्था आहे. ही संस्था आता आयफोन स्मार्टफोन देशभरातील जवळपास 7000 किरकोळ विक्रेत्यांपर्यंत विक्रीसाठी पोहोचवणार आहे.
यामुळे दिल्ली आणि मुंबई व्यतिरिक्त इतर शहरांमध्ये देखील आयफोन प्रेमींना हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे.
HDFC बँक देणार अर्थसहाय्य
याशिवाय कंपनीने HDFC बँकेशी करार केला असून, iPhone 15 स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी आता HDFC बँक ग्राहकांना अर्थसहाय्य देणार आहे. ग्राहकांना या खरेदीवर कॅशबॅक देखील मिळणार आहे असे रेडिंग्टन लिमिटेडने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.