अनेक बँका कर्ज अथवा क्रेडिट कार्डसाठी मंजूरी देताना ग्राहकांचा क्रेडिट स्कोर तपासतात. क्रेडिट स्कोर चांगला असल्यास कर्ज त्वरित मिळते. मात्र, क्रेडिट स्कोर कमी असल्यास गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज काढताना समस्या येऊ शकते. क्रेडिट स्कोर हा तुम्ही वेळेवर कर्ज फेडू शकता का व कर्जासाठी खरचं पात्र आहात का? या गोष्टी दर्शवतो. तुमचा क्रेडिट स्कोर कमी असण्यामागे अनेक कारणे असू शकतात, याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
क्रेडिट स्कोर कमी असण्याची कारणे
कर्जाचे हफ्ते वेळेवर न भरणे - तुम्ही जर क्रेडिट कार्डचा सातत्याने वापर करत असाल मात्र याचे हफ्ते भरत नसल्यास अथवा उशीरा भरत असल्यास याचा परिणाम क्रेडिट स्कोरवर दिसून येतो. केवळ क्रेडिट कार्डच नाही तर कर्जाचे हफ्ते वेळेवर न भरल्यास याचा देखील नकारात्मक परिणाम क्रेडिट स्कोरवर होते. क्रेडिट स्कोरमधील जवळपास 35 टक्के वाटा हा पेमेंट रेकॉर्डचा असतो. त्यामुळे अगदी कमी रक्कमेची थकबाकी असली तरी क्रेडिट स्कोर कमी होतो.
क्रेडिट कार्डचा अतिरिक्त वापर – तुम्ही क्रेडिट कार्डचा किती वापर करता यावरून देखील क्रेडिट स्कोर ठरत असतो. सर्वसाधारणपणे क्रेडिट कार्ड लिमिटच्या 30 टक्क्यांपर्यंत रक्कमेचा वापर करणे चांगले मानले जाते. मात्र, यापेक्षा जास्त वापर करत असल्यास कर्जाच्या रक्कमेत तर वाढ होतेच, सोबतच तुम्ही खर्च भागविण्यासाठी क्रेडिट कार्डवर अवलंबून असल्याचे स्पष्ट होते. यामुळे क्रेडिट स्कोर कमी होतो.
अनेक क्रेडिट कार्डसाठी अर्ज – कमी कालावधीमध्ये वेगवेगळ्या बँकांकडे क्रेडिट कार्डसाठी अर्ज करणे चांगले नाही. तुम्ही केलेल्या अर्जांची नोंद ठेवली जाते व क्रेडिट रिपोर्टमध्ये याचा उल्लेख असतो. वारंवार क्रेडिट कार्डसाठी अर्ज केल्याने बँका देखील मंजूरी देणे टाळतात. यामुळे रेटिंग देणाऱ्या संस्था तुमचा क्रेडिट स्कोर कमी करू शकतात.
संयुक्त खाते (Joint account) – तुम्ही जर इतरांसोबत मिळून बँकेत संयुक्त खाते उघडत असल्यास याचा देखील परिणाम क्रेडिट स्कोरवर होऊ शकतो. संयुक्त खात्यात एका व्यक्तीने घेतलेल्या कर्जासाठी दुसरी व्यक्ती जामीनदार असते. त्यामुळे जर एका व्यक्तीने कर्जाची रक्कम परतफेड करण्यास टाळाटाळ केल्यास याचा परिणाम दुसऱ्या व्यक्तीच्या क्रेडिट स्कोरवर होतो. मात्र, व्यक्ती वेळेवर कर्जाची परतफेड करत असल्यास याचा चांगला परिणाम देखील क्रेडिट रिपोर्टमध्ये दिसून येतो.
किती असावा क्रेडिट स्कोर?
भारतात वेगवेगळ्या संस्थांच्यामार्फत क्रेडिट रेटिंग दिले जाते. यात प्रामुख्याने Equifax, CIBIL, Experian आणि CRIF चा समावेश आहे. या संस्था ग्राहकांच्या आर्थिक व्यवहारावरून 300 ते 900 दरम्यान क्रेडिट स्कोर देतात.
सर्वसाधारणपणे 750 ते 900 दरम्यानची क्रेडिट रेटिंग चांगली मानली जाते. 550 ते 750 दरम्यानची रेटिंग ही सर्वसाधरण मानली जाते. तर 550 च्या खालील रेटिंग वाईट मानली जाते.
क्रेडिट स्कोर कमी असल्यामुळे होणारे परिणाम
क्रेडिट स्कोर कमी असल्यास कर्ज काढताना समस्या येते. क्रेडिट कार्ड देखील मिळत नाही. याशिवाय, कर्ज मिळाल्यास त्यावरील व्याजदर हे नेहमीपेक्षा जास्त असते. अनेक विमा कंपन्या देखील क्रेडिट स्कोरच्या आधारावर विम्याचा हफ्ता ठरवतात. त्यामुळे जर क्रेडिट रेटिंग कमी असल्यास वेळेवर कर्जाचे हफ्ते भरून स्कोर वाढवू शकता.