Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

RBI MPC Meet 2023: कर्जदारांना गिफ्ट मिळणार की EMI चा बोजा वाढणार? थोड्याच वेळात RBI पतधोरण जाहीर करणार

RBI Monetary Policy 2023

RBI MPC Meet 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवून टॅक्सपेअर्सना गिफ्ट दिले होते. आता रिझर्व्ह बँक व्याजदर वाढीला ब्रेक देऊन सामान्यांना दिलासा देईल , अशी अपेक्षा जाणकार व्यक्त करत आहेत.

महागाई आणि व्याजदर वाढीने हैराण झालेल्या सर्वसामान्यांना दिलासा मिळेल का याचे उत्तर थोड्याच वेळात मिळणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून आज बुधवारी 8 फेब्रुवारी 2023 रोजी चालू आर्थिक वर्षातील शेवटचे पतधोरण जाहीर केले जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी बजेटमध्ये करमुक्त उत्पन्नाची मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढवून सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. तशाच प्रकारे आज व्याजदर वाढीचे संत्र थांबवून आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास कर्जदारांना सुखद धक्का देऊ शकतात अशी चर्चा बँकिंग क्षेत्रात आहे. (RBI may Pause rate hike cycle in monetary policy) 

सध्या रिझर्व्ह बँकेचा रेपो दर हा 6.25% इतका आहे. डिसेंबर 2022 मधील पतधोरणात आरबीआयने रेपो दरात 0.35% वाढ केली होती. त्याआधीच्या सलग तीन पतधोरणांमध्ये आरबीआयने 0.50% ने रेपो दर वाढवला होता. गेल्या 10 महिन्यात बँकेने रेपो दरात 2.25% वाढ केली आहे. त्यामुळे कर्जांचा ईएमआय देखील वाढला होता. गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सर्वच प्रकारच्या कर्जांचे व्याजदर वाढले होते.


रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठक सोमवार 6 फेब्रुवारी 2023 पासून मुंबईत सुरु झाली होती. आज बँकेकडून पतधोरण जाहीर केले जाणार आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मधील हे शेवटचे पतधोरण आहे. महागाईचा विचार करता बँकेकडून व्याजदरात आणखी एकदा 0.25% वाढ केली जाऊ शकते, असे बोलले जात आहे. तर काही जाणकारांच्या मते यावेळी व्याजदर जैसे थे ठेवले जातील, अशीही शक्यता आहे. 

रिझर्व्ह बँकेसाठी महागाई दर ही चिंतेची बाब आहे. डिसेंबर महिन्यात अन्नधान्य महागाईत घसरण झाल्याने ग्राहक मूल्यावर आधारिक महागाई दरात घट झाल्याचे दिसून आले होते. डिसेंबरमध्ये महागाई दर 5.7% इतका होता. नोव्हेंबर 2022 मध्ये तो 5.9% इतका होता.  चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत महागाई दर सरासरी 6.1% इतका राहील, असा अंदाज सरकारने व्यक्त केला आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने महागाई दर याच तिमाहीत 6.6% इतका राहील, असे भाकित केले होते.  

फेडरल रिझर्व्हची व्याजदर वाढीसंदर्भातील सौम्य निर्णय

जागतिक पातळीवर अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढीबाबत सौम्य निर्णय घेतला होता. गेल्या आठवड्यात फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.25% वाढ केजी होती. डिसेंबरमध्ये 0.50% आणि त्याआधी सलग चार वेळा 0.75% वेळा फेडरलने व्याजदर वाढवले आहेत. फेडरल रिझर्व्हने वर्ष 2022 मध्ये 4.50% प्रमुख व्याजदर वाढवला आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक आज काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.