देशभरात टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी 150 ते 200 रुपये किलो दराने टोमॅटो विकला जात आहे. एवढेच नाही तर काही राज्यांमध्ये टोमॅटोचे भाव 250 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. टोमॅटोच्या वाढत्या किमतींची दखल आता RBI ने देखील घेतली असून याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
टोमॅटो सहित कांदे, बटाटे, हिरव्या पालेभाज्या, डाळींचे आणि कडधान्यांचे भाव देखील कडाडले आहेत. याचा परिणाम आता इतर उत्पादनांवर देखील पडू शकतो आणि चलनवाढीचा धोका वाढू शकतो असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे. RBI ने जारी केलेल्या निवेदनात याबाबत लिहिले आहे.
टोमॅटो सरासरी 120 रूपये किलो
टोमॅटोच्या वाढत्या किमतीबाबत RBI ने म्हटले आहे की अतिवृष्टीमुळे आणि कीड लागल्यामुळे देशभरातील विविध राज्यातील टोमॅटोचे उत्पन्न घटले आहे. मागणी आणि पुरवठा यांचा सहसंबंध बिघडल्यामुळे देशात टोमॅटोच्या किरकोळ विक्रीत कमालीची भाववाढ पाहायला मिळते आहे. टोमॅटोच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याने लोकांना दिलासा देण्यासाठी काही राज्यात केंद्राने टोमॅटोची 80 रुपये किलो दराने विक्री सुरू केली आहे. सोमवारी टोमॅटोची देशभरातील सरासरी किंमत 120 रुपये प्रति किलो होती.
Rising tomato prices received widespread attention as it has taken toll on household budgets: RBI article
— Press Trust of India (@PTI_News) July 17, 2023
Edited video is available in video section on https://t.co/lFLnN4oaDV pic.twitter.com/eFjoaIyKow
महागाईत टोमॅटोची भर
आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर मायकेल देबब्रत पात्रा यांच्या नेतृत्वाखालील टीमने सादर केलेल्या बुलेटीननुसार टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे देशातील एकूण चलनवाढीमध्ये कमालीचा परिणाम जाणवू लागला आहे. टोमॅटोच्या गगनाला भिडलेल्या किमतींचा परिणाम किरकोळ आणि घाऊक बाजारातील इतर भाज्यांच्या किमतीवर देखील पाहायला मिळतो आहे. गेल्या काही वर्षांमध्ये किमतीत वाढ झाल्याने एकूण चलनवाढीची अस्थिरता रोखण्यासाठी पुरवठा साखळी सुधारणा आवश्यक आहे असे RBI ने मत नोंदवले आहे.
टोमॅटोचे भाव कधी उतरणार?
उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाचा जोर अजूनही कमी झालेला नाही. हिमाचल प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे उत्पादन निघत असते. मात्र पावसामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले असून, रहदारीचे मार्ग देखील बंद झाले आहेत. तसेच महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी पावसाने जोर धरला असून बाजारपेठांमध्ये टोमॅटोची आवक घटलेलीच पाहायला मिळते आहे. त्यामुळे येत्या 15 दिवसांत टोमॅटोच्या किमती स्थिर होतील असा अंदाज सरकार व्यक्त करत असले तरी तशी चिन्हे दिसत नाहीये.