आतापर्यंत सर्वांना 2023-24 चा सर्वसाधारण अर्थसंकल्पात काय आहे हे कळलेच असेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी अर्थसंकल्प जाहीर करताना सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला आहे. यासोबतच काही क्षेत्रांना महागाईचाही फटका बसला आहे. एकूणच या अर्थसंकल्पावर लोक संमिश्र प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. या अर्थसंकल्पात रेल्वेसाठीही (Indian Railway) मोठी घोषणा करण्यात आली आहे. रेल्वेसाठी हा आतापर्यंतचा सर्वात खास अर्थसंकल्प असल्याचे बोलले जात आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की 2023-24 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयांचा भांडवली खर्च उपलब्ध करून देण्यात आला आहे. रेल्वेचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक भांडवली खर्च आहे. लोकसभेत अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन यांनी सांगितले की, सध्याच्या अर्थसंकल्पीय प्रस्तावात रेल्वेसाठी प्रदान केलेला खर्च 2013-14 मधील एकूण भांडवली खर्चाच्या जवळपास 9 पट इतका जास्त आहे. सीतारामन म्हणाल्या की कोळसा, खते आणि अन्नधान्य क्षेत्रांसाठी रेल्वे ही महत्वाची ठरली आहे. या अर्थसंकल्पात रेल्वेशी संबंधित 100 महत्त्वाचे परिवहन पायाभूत सुविधा प्रकल्प राबविले जाणार आहेत. यासाठी 75,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव सरकारने ठेवला आहे, यामध्ये 15 हजार कोटी रुपये खाजगी क्षेत्राच्या गुंतवणुकीतून उभे राहणार आहेत.
अमृतकाल का बजट!#Budget2023 #AmritKaalBudget pic.twitter.com/WQ49e9YJek
— Ministry of Railways (@RailMinIndia) February 1, 2023
अर्थमंत्री म्हणाल्या की, रेल्वेप्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वाढत्या अपेक्षा लक्षात घेऊन, राजधानी, शताब्दी, दुरांतो, हमसफर आणि तेजस सारख्या प्रमुख गाड्यांचे 1,000 हून अधिक डबे नूतनीकरण करण्याची रेल्वे योजना आखत आहे. या डब्यांचे आतील भाग अत्याधुनिक आणि प्रवाशांच्या सोयीनुसार सुधारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जुने रेल्वे ट्रॅक बदलण्यासाठी सरकार विशेष आर्थिक तरतूद करणार आहे. कारण रेल्वेने गाड्यांचा वेग वाढवण्याची आणि वंदे भारत एक्सप्रेस देशातील प्रत्येक राज्यातून सुरू करण्याची योजना आखली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणखी 100 विस्टाडोम कोच बनवण्याचा रेल्वेचा प्रस्ताव आहे.
या अर्थसंकल्पात, सरकारने 35 हायड्रोजन इंधनावर आधारित गाड्या, साइड एंट्रीसह 4,500 नवीन डिझाइन केलेले ऑटोमोबाईल वाहक कोच, 5,000 LHB कोच आणि 58,000 वॅगन तयार करण्याचे प्रस्तावित केले आहे. अर्थसंकल्पीय दस्तऐवजानुसार, 2023-24 च्या अर्थसंकल्पीय अंदाजात रेल्वेचा एकूण महसूल खर्च 2,65,000 कोटी रुपये होता, जो 2022-23 च्या सुधारित अंदाजात 2,42,892.77 कोटी रुपये इतका आहे.
अर्थसंकल्पीय अंदाज 2023-24 मध्ये भांडवली खर्चासाठी 2,60,200 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, ज्यात सामान्य महसुलातून 2,40,000 कोटी रुपये, निर्भया फंडातून 200 कोटी रुपये, अंतर्गत संसाधनांमधून 3000 कोटी रुपये आणि अंतर्गत आणि अतिरिक्त अर्थसंकल्पीय संसाधनांमधून 17,000 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत.