भारतीय क्रिकेटमधील आपल्या कौशल्य आणि विक्रमांमुळे चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारा माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक राहुल द्रविडचा आज वाढदिवस आहे. क्रिकेट जगतात राहूल द्रविडला द वॉल बरोबरच मिस्टर कूल म्हणूनही ओळखले जाते. त्याच्या नम्रता आणि शांत स्वभावामुळे त्याने चाहत्यांचे प्रेम मिळवले आहे. इतकेच नाही तर राहूल द्रविडला 'मिस्टर ट्रस्टवर्दी' असेही संबोधले जाते. राहूल द्रविड हा केवळ माजी भारतीय क्रिकेटपटूच नव्हे तर संघाचा कर्णधार देखील राहिलेला आहे. वाद, मीडिया आणि सोशल मीडियापासून स्वतःला दूर ठेवणे तो पसंत करतो. मैदानावरील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि विक्रमांबद्दल बरेच बोलले जाते. पण राहूल द्रविडच्या नेटवर्थ, उत्पन्न, कार कलेक्शन याविषयी इथे जाणून घेऊया.
11 जानेवारी 1973 रोजी जन्मलेला राहुल द्रविड हा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. राहुल द्रविडची एकूण संपत्ती 23 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 172 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. एका रिपोर्टनुसार, राहुलचे मासिक उत्पन्न 1 कोटी रुपये आणि वार्षिक 12 कोटी रुपये आहे.
राहुल द्रविडचे उत्पन्नाचे स्रोत
राहुल द्रविडच्या कमाईबद्दल बोलायचे तर, तो दोन वर्षांपासून अंडर-19 संघाचा मुख्य प्रशिक्षक राहिला आहे, ज्यासाठी त्याला सुमारे 5 कोटी रुपये मिळाले. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख म्हणून त्यांना महिन्याला 60 लाख रुपये मिळतात. जेव्हा भारताने अंडर 19 वर्ल्ड कप 2018 जिंकला तेव्हा त्याला बोनस म्हणून 50 लाख रुपये देण्यात आले होते, मात्र द्रविडने ते स्वीकारण्यास नकार दिला. भारतीय क्रिकेटचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांची कमाई करोडोंमध्ये आहे.
राहुल द्रविडचे आलिशान घर, कार कलेक्शन
राहुल द्रविडला दोन मुलगे आहेत. बंगळुरूच्या इंदिरा नगरमध्ये द्रविड आपल्या कुटुंबासह राहतो. राहुलचे येथे आलिशान घर आहे, ज्याची किंमत सुमारे 4 कोटी रुपये आहे. भारताच्या या माजी खेळाडूला लक्झरी कारचाही शौक आहे. राहुल द्रविडकडे मर्सिडीज बेंझ आहे. याशिवाय द्रविडच्या कलेक्शनमध्ये BMW 5 Series आणि Audi Q5 लक्झरी SUV सारखी वाहने आहेत.