जेमतेम 30 दिवसानंतर अर्थमंत्री निर्मला सितारामन लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील. वाढती महागाई, जागतिक अस्थिरता, बेरोजगारी आणि कोरोना पुन्हा डोके वर काढण्याची भीती असताना सर्वसामान्य नागरिकांपासून उद्योजकांना या अर्थसंकल्पापासून मोठ्या आशा लागल्या आहेत. जगभरात कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर बहुराष्ट्रीय कंपन्या चीनमधील गुंतवणूक काढून भारतामध्ये करेल, अशी आशा निर्माण झाली होती. दरम्यान, केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पात करवाढ करण्यात येईल अशी भीती रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केली आहे. चीनला पर्याय म्हणून भारतामध्ये गुंतवणूक होण्यामध्ये करवाढ अडथळा ठरेल, असे मत त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
व्हिएतनामला भारतापेक्षा अधिक पसंती
विकासाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने समजूतदारपणे शाश्वत सुधारणा करण्याची गरज आहे. अनेक कंपन्या निर्मिती प्रकल्प भारतामध्ये हलवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, करवाढीमुळे कंपन्या भारताला पसंती देणार नाहीत, असे मत राजन यांनी व्यक्त केले. चीनमधून निर्मिती प्रकल्प दुसऱ्या देशांमध्ये हलवण्यासाठी कंपन्यांपुढे भारता हा पहिल्या क्रमांकाचा पर्याय नाही. त्याऐवजी कंपन्यांकडून व्हिएतनामला सर्वात जास्त पसंती दिली जात आहे. कारण तेथील धोरणे उद्योगधार्जिणी आणि स्थिर आहेत, असेही ते म्हणाले.
निश्चित धोरण आखण्याची गरज
भारताला अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी अधिक निश्चित धोरणे आखावे लागतील. तसेच परकीय गुंतवणुकीला हानीकारक ठरतील अशी धोरणे टाळायला हवीत. मागील काही वर्षात स्थानिक किरकोळ दुकानदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी भारताने अॅमेझॉन आणि वॉलमार्ट विरोधात काही धोरणे आखली. अमेरिकेतील कंपन्यांना परकीय गुंतवणुकीसाठी मेक्सिको हा उत्तम पर्याय आहे. मेक्सिको देश नाफ्टा (North Atlantic free trade agreement -NAFTA) गटाचा सदस्य असल्याने त्याचा फायदा कंपन्यांना होईल, असे राजन म्हणाले.
भारतीय नागरिकांचा खर्चाचा बदलता आलेख
भारतामध्ये बेरोजगारीचा दर दिवसेंदिवस वाढत आहे. ऑक्टोबर महिन्यात बेरोजगारीचा दर 7.7% होता. त्यात नोव्हेंबरमध्ये वाढ होऊन 8% टक्के झाला. नोकर कपात आणि बेरोजगारीमुळे मध्यमवर्ग होरपळला आहे, खर्च करण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे चालू वित्तीय तूट देखील वाढत असल्याचे रघुराम राजन म्हणाले. वित्तीय तूट वाढ असताना तसेच जागतिक अर्थव्यवस्था कमकुवत झाली असताना येत्या काळात रिझर्व्ह बँकेपुढे आव्हान असल्याचेही राजन म्हणाले.