PNB Q1 Results: पंजाब नॅशनल बँकेने नव्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचा (एप्रिल-जून) निकाल जाहीर केला. यातून बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचे समोर आले आहे. पहिल्या तिमाहीत बँकेच्या नफ्यात 307% वाढ झाली. तसेच बुडीत कर्जाचे प्रमाणही कमी ठेवण्यात बँकेला यश आले. दरम्यान, मागील सहा महिन्यात PNB च्या शेअर 24 टक्क्यांनी वाढून 63 रुपयांवर पोहचला आहे.
बुडीत कर्जाचे प्रमाण घटले
मागील आर्थिक वर्षात (एप्रिल-जून) तिमाहीत बँकेचा नफा फक्त 308.44 कोटी रुपये होता. या कालावधीशी तुलना करता चालू वर्षी नफा 1255.41 कोटी रुपयांवर पोहचला आहे. तसेच बुडीत कर्जाच्या टक्केवारीचे प्रमाण 11.2% वरुन 7.73 टक्क्यांवर आले आहे.
सहा महिन्यात 24 टक्क्यांनी शेअर्स वधारला
मागील सहा महिन्यात पंजाब नॅशनल बँकेचा शेअर सुमारे 24 टक्क्यांनी वधारला. 1 मार्च 2023 रोजी शेअरची किंमत 50 रुपये होती. आता शेअर 63 रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे.
सौजन्य - गुगल
कर्ज वाटपातील वाढ सकारात्मक
निकालानंतर PNB च्या शेअरमध्ये 4 टक्क्यांची वाढ झाली. बँकेचे व्याजाच्या स्वरुपात मिळणारे उत्पन्नही वाढले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत बँकेचे गृहकर्ज वाटपाचे प्रमाण 12 टक्क्यांनी वाढले. वाहन कर्ज 27.1 टक्के आणि वैयक्तिक कर्ज 46.4% वाढले. बचत ठेवींमध्येही वाढ झाली.
पंजाब नॅशनल बँकेच्या सद्यस्थितीत दहा हजारांपेक्षा जास्त शाखा आहेत. यापैकी 39% शाखा ग्रामीण भागात, 24% निमशहरी, 20% शहरी आणि 20% मेट्रो शहरात आहेत. आंतरराष्ट्रीय व्यवहार हाताळण्यासाठी 2 शाखा आहेत.