आपण बऱ्याच वेळा रेल्वेने प्रवास करताना कधीतरी घाईगडबडीत तिकीट काढायला विसरतो. अनेकजण तर जाणूनबुजून तिकीटच काढत नाही. याचा परिणाम असा होतो की, रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभारलेल्या टीसीला आपण सापडतो आणि मग दंड भरावा लागतो. रेल्वेमधून विनातिकीट प्रवास करणे हा दंडनीय गुन्हा आहे. दिवसेंदिवस विना तिकीट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढतंच चालले आहे. अशा फुकट्या प्रवाशांवर पुणे रेल्वे पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 1 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.
नुकताच पुणे रेल्वे विभागाने मार्च महिन्यातील विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा आकडा आणि दंडाची रक्कम जाहीर केली आहे. हा आकडा खरंच धक्कादायक असून दंडाची रक्कम देखील कोटीमध्ये वसूल करण्यात आली आहे. ही रक्कम फक्त मार्च महिन्यातील आहे.
Table of contents [Show]
मार्च महिन्यात 1 कोटीहून जास्तीचा दंड वसूल
पुणे रेल्वेकडून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची तपासणी सातत्याने करण्यात येते. पण मार्च महिन्यात करण्यात आलेल्या तपासणी दरम्यान 21,756 प्रवासी विना तिकीट प्रवास करताना सापडले आहेत. या लोकांकडून 1 कोटी 72 लाख 23 हजार रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आला आहे. याशिवाय माल-सामान बुक न करता रेल्वेमधून तसेच घेऊन प्रवास केलेल्या एकूण 215 प्रवाशांकडून 23 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. रेल्वेच्या नियमांचे पालन न करता प्रवास करणाऱ्या 7050 प्रवाशांकडून 40 लाखांचा दंड वसूल केला आहे.
प्रवाशांच्या काही चुकांमुळे रेल्वेला मात्र बक्कळ कमाई झाली आहे. लवकरच आर्थिक वर्षातील दंडाची रक्कम जाहीर केली जाईल, असे पुणे रेल्वे पोलिसांनी म्हटले आहे. केवळ मार्च महिन्यात समोर आलेली दंडाची रक्कम चक्रावून टाकणारी आहे. यावरून रेल्वेने फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या दिसून येते. या अशा फुकट प्रवास करणाऱ्यांमुळे रेल्वेचे आतोनात नुकसान होते.
फुकट्यांवर कारवाई करण्यासाठी समितीची स्थापना
पुणे रेल्वे विभागाच्या अंतर्गत विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी एक समिती तयार करण्यात आली आहे. या समितीमध्ये विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह, वरिष्ठ वाणिज्य विभागाचे व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे आणि डॉ. रामदास भिसे यांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली पुणे रेल्वेच्या तिकीट निरीक्षकांनी ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडली.
पूर्व उत्तर रेल्वे विभागाने 70 कोटी दंड वसूल केला होता
पूर्व उत्तर रेल्वे विभागाने 2022-23 या आर्थिक वर्षात विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून तब्बल 70 कोटी रुपये दंडाच्या माध्यमातून वसूल केले आहेत. पूर्व उत्तर लखनऊ विभागाचे व्यवस्थापक अमर प्रताप सिंह यांच्या मागदर्शनाखाली केलेल्या कारवाईत रेल्वे पोलिसांनी इतक्या मोठ्या प्रमाणात विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली होती. या कारवाईतून पूर्व उत्तर रेल्वे विभागाला 70 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. जो मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 17 टक्के जास्त असल्याचे सांगितले जाते.
विना तिकिटाबाबत रेल्वेचा नियम काय सांगतो?
तुम्ही विना तिकीट रेल्वेने प्रवास करताना टीसीने तुम्हाला पकडले, तर रेल्वेच्या नियमानुसार तुम्ही दंडासाठी पात्र ठरता. हा दंड आकारताना गाडीचा दर्जा म्हणजेच फास्ट मेल, एक्सप्रेस, साधारण मेल, पॅसेंजर याचा विचार केला जातो आणि त्यानुसार दंड आकारला जातो.
गाडी ज्या स्थानकावरून सुटली आहे, त्या स्थानकापासून दंडाची रक्कम पकडण्यात येते. याशिवाय तिकिटाची रक्कम जेवढी असेल तेवढी किंवा 250 रुपये दंड आकारण्यात येतो. दंडाची रक्कम प्रवाशाने न भरल्यास रेल्वेच्या न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात येते. न्यायालयाच्या तारखेनुसार प्रवाशाला हजर रहावे लागते. याठिकाणी 1000 रुपये दंड आणि 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा देण्यात येऊ शकते.