PMC WhatsApp: पुणे महानगरपालिकने नागरिकांसाठी सरकारी सेवा मिळण्याचा मार्ग अधिक सुलभ केला आहे. नुकतेच महानगरपालिकेने व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवा सुरू केली असून याद्वारे विविध सेवा मोबाइलद्वारे ग्राहकांना उपलब्ध झाल्या आहेत. पालिकेच्या वेबसाइटवरही या ऑनलाइन सेवा उपलब्ध आहेत. मात्र, व्हॉट्सअॅप हा त्यापेक्षाही जलद पर्याय आहे.
कसे वापराल व्हॉट्सअॅप चॅटबॉट?
या सुविधेमुळे नागरिकांचे पालिकेसोबतचे डिजिटल कम्युनिकेशन आणखी जलद झाले आहे. 8888251001 हा मोबाइल क्रमांक ग्राहकांना मोबाइलमध्ये सेव्ह करावा लागेल. त्यानंतर Hi असा मेजेस केल्यानंतर विविध सेवांचे पर्याय येतात. नागरिकांना जी सेवा पाहिजे त्यावर क्लिक करून पुढील प्रक्रिया करता येईल.
व्हॉट्सअॅप चॅटबॉटद्वारे कोणत्या सुविधा ग्राहकांना मिळतील?
बिल देयके, विविध प्रकारचे परवाने, दाखला, ना हरकत प्रमाणपत्र, विभागानुसार योजना, तक्रार, आणीबाणीच्या काळात उपयोगी पडतील असे क्रमांक यासह इतरही काही सुविधा ग्राहकांना व्हॉट्सअॅपद्वारे उपलब्ध आहेत

चॅटबॉटद्वारे नागरिकांना जलद सुविधा मिळतील, असा विश्वास महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ही सेवा कशी वापरावी याची सविस्तर माहिती महापालिकेने संकेतस्थळावर देखील दिली आहे. नागरिक ही माहिती पालिकेच्या वेबसाइटवर जाऊन वाचू शकतात. सरकार सुविधाही आता कात टाकत असल्याचे यातून दिसून येत आहे. अनेक सरकारी विभागांनी व्हॉट्सअॅप चॅटबॉटद्वारे ग्राहकांना सुविधा देण्यास सुरुवात केली आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            