मुंबईतील मेट्रो सुविधेला नागरीकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता, नवी मुंबईत देखील मेट्रोचे काम सुरु करण्यात आले होते. नवी मुंबईत राहणाऱ्या नागरीकांचा मुंबईला येताना प्रवास सुखकर व्हावा यासाठी मेट्रोचे काम राज्य सरकारने हाती घेतले होते. आता नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटन सोहळ्याची तारीख ठरल्यामुळे मेट्रोच्या कामांना वेग आला आहे. सेंट्रल पार्क आणि बेलापूर स्थानकांदरम्यान नवी मुंबई मेट्रोच्या 5.96 किमी लांबीच्या सेक्शनचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. अगोदर ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 16 ते 20 जानेवारी दरम्यान वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) च्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दावोसला जाणार होते, परंतु 19 जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमामुळे त्यांच्या दौऱ्यात बदल होऊ शकतो.
एलिव्हेटेड मुंबई मेट्रो 2 ए आणि 7 लाईन्सचे बांधकाम मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटीद्वारे (MMRDA) करण्यात आले आहे. या दोन्ही मेट्रो मार्ग लिंक रोड (Link Road) आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे (WEH) मधून जातात आणि त्यामुळे या प्रमुख रस्त्यांवरील रहदारी कमी होईल तसेच विद्यमान उपनगरीय लोकल ट्रेन सेवेतील गर्दी कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
एप्रिल 2022 मध्ये, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या पश्चिम उपनगरातील धनुकरवाडी (कामराजनगर) ते आरे कॉलनीपर्यंतच्या 20 किमी लांबीच्या 2A आणि 7 लाईनच्या पहिल्या टप्प्याला हिरवा झेंडा दाखवला होता. या मेट्रो मार्गिकेत 30 स्थानके असणार आहेत. या दोन्ही मार्गांचा 35 किलोमीटरचा एलिव्हेटेड कॉरिडॉर कार्यान्वित झाल्यानंतर, दररोज सुमारे 3 लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करू शकणार आहेत. मेट्रो रेल्वेचे संचालन आणि देखभाल करण्याची व्यवस्था महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL) संभाळणार आहे.
BMC निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या प्रकल्पांचे उद्घाटन भाजप आणि शिंदे गटांसाठी देखील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे आहे.