देशात काही महिन्यांपासून किरकोळ महागाईच्या दरात वाढ होताना दिसते आहे. पालेभाज्या, तेल, टोमॅटो, कोथिंबीर, कांदे आणि लसूण यांचे भाव वाढल्यानंतर आता डाळी आणि कडधान्यांचे भाव देखील वाढले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून डाळींच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. या वर्षीही डाळीचे भाव 10 टक्क्यांनी वाढले असल्याचे निदर्शनास आले आहे. येणाऱ्या काही दिवसांत भाववाढ कायम असेल असे मानले जात आहे.
दिवसेंदिवस डाळी आणि कडधान्यांच्या किमती वाढत असल्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशावर अधिक भार पडत आहे. सामन्य नागरिकांचे स्वयंपाकाचे बजेट बिघडले असल्यामुळे सरकारने वाढत्या किमती नियंत्रित ठेवाव्यात अशी सामान्य नागरिक मागणी करत आहेत.
जून महिन्यात ग्राहक महागाई 4.81 टक्क्यांवर पोहोचली आहे. ऐन पावसाळ्यात सामान्य नागरिकांच्या आहारात असलेले जिन्नस महाग झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे.
डाळींच्या भाववाढीचा दर दुप्पट
रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या मते, गेल्या पाच महिन्यांत डाळींच्या महागाईचा दर जवळपास दुप्पट झाला आहे. मे महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकाने डाळींची महागाई 5.8 टक्के आणि सीपीआय 6.6 टक्के नोंदवली होती. त्याचवेळी जूनमध्ये डाळींच्या महागाईचा दर 10.58 टक्क्यांवर पोहोचला आहे.
अशाप्रकारे, गहू, तांदूळ यांसारख्या धान्यांपेक्षा डाळींचे भाव अधिक प्रमाणात वाढले आहेत. याचा थेट परिणाम स्वयंपाकाच्या बजेटवर झालाय, तसेच हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे दर देखील वाढले आहेत. क्रिसिलच्या अहवालानुसार तांदळाच्या दरातही सुमारे 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर गव्हाच्या दरातही 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
तूर आणि उडद डाळीला मागणी
सदर अहवालानुसार तूर आणि उडद डाळीचे भाव सर्वाधिक वाढले आहेत. या दोन्ही डाळी सर्वसामान्य नागरिकांच्या आहारातील महत्वाचा घटक आहे. वर्षाचे बारा महिने या डाळींना मागणी असते. तसेच या वर्षी दोन्ही पिकांचे उत्पादन दरवर्षीपेक्षा कमी झाल्यामुळे तसेच मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे या डाळींचे भाव वाढले आहेत असे अहवालात म्हटले आहे.