रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून जगभरात इंधन आणीबाणी निर्माण झाली आहे. बहुतांश युरोपीयन देशांना रशियामधून इंधन पुरवठा होतो. मात्र, युद्धामुळे या तेल पुरवठा साखळीमध्ये अडथळा निर्माण झाल्याने युरोपातील इंधनाच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेतील सर्वच क्षेत्रांवर दिसून आला. भारातमध्येही महागाईत वाढ झाली. रशियाकडून जगभर पुरवठा होणाऱ्या इंधनावर विक्री किंमतीची मर्यादा घालण्याचा विचार युरोपीयन देश करत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून हा निर्णय अमेरिका आणि युरोप लागू करण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम भारतावरही होऊ शकतो.
प्राईज कॅपचा भारतावर काय परिणाम होणार?
रशिया-युक्रेन युद्धामध्ये भारताने तटस्थ भूमिका घेतील आहे. पश्चिमी देशांची आघाडी किंवा रशिया कोणाचीही बाजू भारताने घेतली नाही. मात्र, युद्ध बंद व्हायला हवे, असे म्हटले आहे. दरम्यान, रशिया युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर भारताने रशियाकडून कच्च्या इंधनाची आयात वाढवली आहे. डिसेंबरमहिन्यात भारताने रशियाकडून प्रतिमहा 10 लाख बॅरल तेल घतले. स्वस्तात तेल मिळत असल्याने भारताने रशियाकडून तेल घेण्यास प्राधान्य दिले आहे. पश्चिमी देशांनी जरी रशियाच्या तेलावर किंमत मर्यादा घातली तरी भारताला सध्या बाजारभावापेक्षा कमी दरात रशियाकडून तेल मिळत असल्याने भारताने आयात वाढवली आहे. याचा भारतावर जास्त परिणाम होण्याची शक्यता नाही.
पश्चिमी देशांचा दबाव वाढू शकतो -
रशियाकडून होणारी तेलाची आयात कमी करण्यासाठी भारतावर पश्चिमी देशांचा दबाव वाढू शकतो. विशेषत: पुढील महिन्यात किंमत मर्यादा लागू केल्यानंतर हा दबाव वाढू शकतो. तेल निर्यातीतून मिळणाऱ्या महसुलातून रशियाला युक्रेन युद्धासाठी पैसे मिळतात. त्यामुळे जर रशियावर किंमतीची मर्यादा घातली तर त्यांना जगभरात स्वस्तात तेल विकावे लागेल, यातून रशियाला जास्त पैसे मिळणार नाहीत आणि रशियाची नाकेबंदी होईल, असा पश्चिम देशांचा अंदाज आहे.
रशियाची आक्रमक भूमिका -
जर युरोप आणि अमेरिकेने रशियन तेलावर किंमत मर्यादा घातली तर युरोपला करण्यात येणारा इंधन पूरवठा पूर्णपणे तोडून टाकू अशी आक्रमक भूमिका रशियाने घेतली आहे. यामुळे संपूर्ण जगामध्ये आणखी महागाई वाढण्याची भीती आहे. आधीच मंदीची स्थिती निर्माण झाली असताना भारतही यात होरपळून निघेल. भारतामध्ये महागाई आणखी वाढण्याची शक्यता किंमत मर्यादा लावल्यामुळे निर्माण होऊ शकते.