Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UPI पेमेंटवर Pre-Approved Credit Line मिळणार म्हणजे नक्की काय होणार?

Pre-Approved Credit Line For UPI

Pre-Approved Credit Line For UPI: रिझर्व्ह बँकेने नुकत्याच झालेल्या एका बैठकीत डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी UPI वर पूर्व मंजूर क्रेडिट लाईन देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे ग्राहकांना क्रेडिट कार्डसारखी सुविधा आता UPI वर उपलब्ध होणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चलनविषयक धोरण समितीच्या (Monetary Policy Committee-MPC) बैठकीत बँकिंग व्यवहार आणि डिजिटल पेमेंटसाठी वापरल्या जाणाऱ्या युपीआय (Unified Payment Interface-UPI) पेमेंट मोडच्या विस्ताराबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. भारतातील UPI पेमेंटचा वाढता विस्तार लक्षात घेऊन यापुढे UPI वापरकर्त्याला अनेक नवीन आणि दर्जेदार सुविधा देण्यावर या बैठकीत विचार करण्यात आला. त्य अनुषंगाने डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांता दास (Shaktikanta Das) यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. यापुढे  UPI वर पूर्व मंजूर क्रेडिट लाईन (Pre-Approved Credit Line) दिली जाणार आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना क्रेडिट कार्ड सारखी सुविधा आता UPI वर उपलब्ध होणार आहे.

UPI पेमेंटचा वाढता विस्तार

सध्या देशात UPI पेमेंट मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. याचा विस्तार देखील जलद गतीने होत आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) आकडेवारीनुसार, भारतात एकूण 8.7 अब्ज व्यवहार हे UPI च्या माध्यमातून होत आहेत. हे व्यवहार वार्षिक आधारावर 60 टक्क्यांनी वाढत आहेत. गेल्या 12 महिन्यांतील माहितीनुसार, दररोज सरासरी 36 कोटी व्यवहार UPI च्या माध्यमातून केले जात आहेत. त्यामुळे या माध्यमाला आणखी विकसित करण्याचा विचार आरबीआय करत आहे. यापुढे UPI वर पूर्व मंजूर क्रेडिट लाईन दिली जाईल, असे आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांनी सांगितले.

पूर्व मंजूर क्रेडिट लाईन म्हणजे नक्की काय?

पूर्व मंजूर क्रेडिट लाईन म्हणजे बँकेद्वारे वापरकर्त्यांसाठी खर्च करू शकणाऱ्या कर्जाची रक्कम. बँका आणि वित्तीय संस्था वापरकर्त्याच्या उत्पन्न आणि कर्जाची परतफेड करण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन करून त्याची क्रेडिट लाईन तयार करतील. थोडक्यात UPI वर ओव्हरड्राफ्टसारखी सुविधा यापुढे वापरकर्त्यांना मिळणार आहे.

वापरकर्ते गरजेनुसार यातील रक्कम वापरतील आणि त्यानंतर व्याजासह ती रक्कम बँकेला परत करतील. ही सुविधा वापरण्यासाठी बँका व्याजदर मात्र आकारणार आहेत. प्रत्येक बँकेचा व्याजदर वेगळा असू शकतो. वापरकर्त्याची जोखीम स्वीकारण्याच्या क्षमतेचा अभ्यास करूनच त्यांना ही सुविधा देण्यात येईल.  

जर तुमच्याकडे बँकेने दिलेली पूर्व मंजूर क्रेडिट लाईन असेल, तर तुमच्या खात्यात एकही रुपया नसला तरीही तुम्ही खरेदी किंवा आर्थिक व्यवहार करू शकणार आहेत. थोडक्यात ही एक प्रकारची बँकेने दिलेली पूर्व मंजूर कर्जाची पद्धत असेल.

जर तुम्हाला अशा स्वरूपाची क्रेडिट लाईन हवी असेल, तर तुम्हाला बँकेशी संपर्क साधावा लागेल आणि तसा अर्ज करावा लागेल. तुम्ही अर्ज केल्यानंतर बँक त्यांच्या बाजुने व्हेरिफिकेशन करून तुम्हाला ही सुविधा उपलब्ध करून देऊ शकते. ही प्रक्रिया पारंपरिक कर्ज घेण्याच्या प्रक्रियेप्रमाणेच असेल. पारंपरिक कर्ज घेण्यापेक्षा बँकेच्या क्रेडिट लाईनचा वापर UPI वर करणे अधिक सहज आणि सोपे असेल, असे सांगण्यात येत आहे. मात्र असे असले, तरीही या पद्धतीत व्याजदर हा तुलनेने जास्त असणार आहे. याची वापरकर्त्यांनी नोंद घेणे गरजेचे आहे.