जर तुम्हाला देखील ठराविक कालावधीसाठी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवायचा असेल, तर बँकेतील मुदत ठेव (fixed deposit) हा एक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध आहे. सध्या अनेक बँका एफडीवरील गुंतवणुकीवर सर्वोत्तम व्याजदर देतात. बँका वेगवेगळ्या गुंतवणूक कालावधीसाठी वेगवेगळा व्याजदर देत आहेत.
मे 2023 मध्ये पंजाब नॅशनल बँक (PNB), एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि येस बँकेने (Yes Bank) त्यांच्या एफडीवरील व्याजदरात बदल केले आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि जास्तीत जास्त गुंतवणूक मिळवण्यासाठी या बँकांनी सर्वोत्तम व्याजदर द्यायला सुरुवात केली आहे. कोणत्या बँकेमध्ये पैशांची गुंतवणूक केल्यावर सर्वोत्तम परतावा मिळेल, हे जाणून घेण्यासाठी बँका देत असलेल्या व्याजदराबद्दल जाणून घेऊयात.
पंजाब नॅशनल बँक (PNB)
देशातील पंजाब नॅशनल बँक (PNB) एफडीवरील गुंतवणुकीवर सर्वोत्तम व्याजदर देत आहे. बँक सामान्य ग्राहकांना 7 दिवसापासून ते 10 वर्षापर्यंतच्या एफडीवर 3.50% ते 7.25% व्याजदर देत आहे. याशिवाय 666 दिवसांच्या विशेष एफडीवर 7.25% सर्वोत्तम व्याजदर देत आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाईटनुसार नवीन व्याजदर 18 मे 2023 पासून लागू करण्यात आले आहेत.
एचडीएफसी बँक (HDFC Bank)
एचडीएफसी बँक (HDFC Bank) आपल्या ग्राहकांना निश्चित कालावधीसाठी सर्वोत्तम व्याजदर देत आहे. याशिवाय 2 स्पेशल एफडी योजना देखील राबवत आहे. एचडीएफसी बँक आपल्या ग्राहकांना 35 महिन्यांसाठी 7.20% व्याज देत असून 55 महिन्यांच्या एफडीवर 7.25% व्याजदर देत आहे. या दोन बँकेच्या विशेष एफडी योजना आहेत. या योजनांमध्ये बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना 35 महिन्यांसाठी 7.70% व्याज, तर 55 महिन्यांसाठी 7.75% व्याजदर देण्यात येत आहे. याशिवाय 18 महिन्यापासून ते 10 वर्षापर्यंत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवरील गुंतवणुकीसाठी 7% व्याजदर देण्यात येत आहे.
येस बँक (Yes Bank)
येस बँक सर्वसामान्य नागरिकांना एफडीवरील गुंतवणुकीसाठी 3.25% ते 7.75% दरम्यान व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 3.75% ते 8.25% व्याजदर देण्यात येत आहे. तसेच 18 महिने ते 36 महिन्यांच्या एफडीवर ग्राहकांना सर्वात जास्त 7.75% व्याजदर मिळत आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाईटनुसार नवीन व्याजदर 2 मे 2023 पासून लागू करण्यात आले आहेत.
Source: hindi.moneycontrol.com