PM Modi Gold Statue: भारतामध्ये व्यक्तीपूजा काही नवीन नाही. दक्षिणेतील अभिनेत्यांची तर मंदिरं बांधली गेलीयं. दोन वर्षापूर्वी पुण्यातल्या एका मोदींच्या चाहत्याने त्यांचे मंदिर बांधले होते. औंध भागातील परिहार चौकाजवळ हे मोदी मंदिर बांधण्यात आलं आहे. आता गुजरातमधील सुरतच्या एका कारागीराने मोदींची चक्क सुवर्णमूर्ती तयार केली आहे. विधानसभा निवडणुकीतील जंगी विजय साजरा करण्यासाठी मोदींच्या या चाहत्याने सोन्याची मूर्ती बनवली.
18 कॅरेट सोन्यापासून बनवली मूर्ती (PM Modi statue made with 18 caret gold)
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने 182 पेकी 156 जागा जिंकल्या. निवडणुकीतील हा विजय साजरा करण्यासाठी सुरतच्या बसंत बोहरा या व्यापाऱ्याने ही सोन्याची मूर्ती बनवली. या मूर्तीचे वजन 156 ग्रॅम असून 18 कॅरेट सोन्यापासून तयार केली आहे. तब्बल 3 महिने 20 ते 25 कारागीरांच्या चमूने मूर्ती तयार करण्यासाठी मेहनत घेतली. या मूर्तीची किंमत 11 लाख रुपये आहे. वसंत बोहरा हे ‘राधिका चेन्स’ या सूवर्ण पेढीचे मालक आहेत. मोदींच्या या मूर्तीला अनेकांनी विकत घेण्याची तयारी दर्शवल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, अद्याप कोणालाही मूर्ती विकली नसल्याचे त्यांनी सांगितले.
‘मी मोदींची मोठा चाहता’ (Fan made Modi's Golden statue)
बोहरा यांनी सांगितलं की, "मी मोदींचा मोठा चाहता आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी काहीतरी करू इच्छित होतो. त्यामुळे मी सोन्याची मूर्ती तयार केली. ज्या प्रकारे मूर्ती तयार झाली आहे त्यावरुन मी समाधानी आहे. या मूर्तीची अद्याप किंमत ठरवली नाही. विक्रीसाठीही ती ठेवली नाही". सोशल मीडियावर ही मूर्ती व्हायरल झाली असून यावर अनेक कंमेंटही येत आहेत.
पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेचे नाणी (Coins with PM Modi's Image)
मोदींची मूर्ती बनवण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी मध्यप्रदेशातील इंदौर आणि अहमदाबाद येथील व्यापाऱ्यांनीही मोदींची मूर्ती तयार केली होती. धनत्रयोदशीच्या दिवशी मोदींची प्रतिमा असलेल्या नाण्यांचीही मोठी विक्री झाली होती. उत्तर प्रदेशातील मेरठ येथे सुवर्ण प्रदर्शनातही मोदींच्या प्रतिमेच्या नाण्यांची चर्चा झाली होती.
पुण्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका चाहत्याने 2021 साली मोदींचं मंदिर उभारलं होतं. पुण्यातील औंध भागामधील परिहार चौकाजवळ मयूर मुंढे या भाजपच्या कार्यकर्त्यानं हे मंदिर उभारलं आहे. पिंपरी-चिंचवड येथील मार्बल विक्रेते दिवांशू तिवारी यांनी जयपूरमधून नरेंद्र मोदींचा पुतळा तयार करुन घेतला होता. याकरिता 1 लाख 60 हजार रुपये खर्च करण्यात आला होता. आता मोदींची सोन्याची मूर्तीही पुन्हा फेमस होत आहे.