PhonePe UPI Lite: जगभरात सर्वाधिक ऑनलाइन पेमेंट भारतात होतात. गुगल आणि फोन पे या UPI पेमेंटमधील आघाडीच्या कंपन्या आहेत. पाच दहा रुपयांचे पेमेंट करण्यासाठीही नागरिक युपीआय अॅपचा वापर करतात. प्रत्येक दुकानावर क्यूआर कोड स्कॅनर सहज दिसतात. भारतात दरदिवशी होणाऱ्या लाखो व्यवहारांपैकी सर्वाधिक व्यवहार हे कमी किंमतीचे असतात. त्यामुळेच छोट्या रकमेचे व्यवहार अधिक सुलभ करण्यासाठी फोन पे ने UPI Lite फिचर आजपासून सुरू केले आहे. 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे पेमेंट पिनकोड शिवाय करता येतील.
पिनशिवाय वॉलेटमधून पेमेंट होईल
कमी किंमतीचे पेमेंट सुलभ करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सप्टेंबर 2022 मध्ये युपीआय लाइट हे फिचर लाँच केले होते. गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी या फिचरची घोषणा केली होती. UPI पेमेंट जलद आणि सुरक्षित व्हावेत यावर लक्ष देण्यात आले. (PhonePe UPI Lite) या फिचरमुळे फोन पे वॉलेटमधून पैसे कट होतील. रिअल टाइम बँकिंग व्यवहाराचा यात समावेश होणार नाही. म्हणजेच सर्व्हर डाऊन, लो नेटवर्क, स्लो स्पीड यापासून पेमेंट करताना ग्राहकांची सुटका होणार आहे.
युपीआय लाइट फिचरद्वारे पेमेंट फेल होण्याचे प्रमाणही कमी होऊ शकते. पेटीएमने देखील युपीआय लाइट सुविधा फेब्रुवारी महिन्यात लाँच केली. देशातील महत्त्वाच्या बँक युपीआय लाइट फिचरला सपोर्ट करतात. त्यामुळे पुढील वेळी तुम्ही दुकानात एखादी कमी किंमतीची वस्तू घ्यायला गेलात तर युपीआय लाइट वॉलेटद्वारे पेमेंट करा. जलद पैसे ट्रान्सफर होतील, आणि पेमेंट फेल होण्याचा धोकाही नाही.
भारतामध्ये एक दिवसात जे काही युपीआय पेमेंट होतात त्यापैकी सर्वाधिक पेमेंट हे कमी किंमतीचे असतात. मात्र, हे पेमेंट ऑनलाइन मोड ने करताना सर्व्हरवर अतिरिक्त लोड येतो. त्यामुळे पेमेंट फेलही होऊ शकते. युपीआय लाइट वॉलेटद्वारे पेमेंट करताना तुम्हाला बँक सर्व्हरशी कनेक्ट होण्याची गरज नाही. थेट तुमच्या वॉलेटमधून पैसे कट होतील. दिवसभरातील काही ठराविक वेळांमध्ये युपीआय सर्व्हरवर अतिरिक्त लोड असतो. या काळात पेमेंट अयशस्वी होण्यापासून वाचायचे असेल तर या वॉलेटमधून तुम्ही पेमेंट करू शकता.
UPI Lite कसे सेटअप कराल?
- फोन पे अॅप ओपन करून प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा.
- युपीआय लाइट असा पर्याय दिसेल. जर हा पर्याय दिसत नसेल तर अॅप अपडेट करा.
- लाइट वॉलेटमध्ये पैसे अॅड करा.
- युपीआय लाइट वॉलेटमध्ये तुम्ही 2 हजार रुपयापर्यंत पैसे अॅड करू शकता. तुमच्या लिंक केलेल्या बँक खात्यातून पैसे युपीआय लाइट वॉलेटमध्ये घेता येतील.
- जेव्हा तुम्हाला पेमेंट करायचे असेल तेव्हा युपीआय लाइट असा पर्यायही तुम्हाला दिसेल. बँक खात्याऐवजी हा पर्याय सिलेक्ट करा.
- 200 रुपयांपेक्षा जास्त रकमेचे पेमेंट करता येणार नाही.