भारतीय तेल कंपन्यांनी बुधवारी (दि. 23) पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटरमागे 80 पैशांनी वाढ केली. तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या किमतीत प्रति लिटर 75 पैशांची आणि डिझेलच्या किमतीत 76 पैशांची वाढ केली. सलग 2 दिवसांत तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात प्रत्येकी 1.80 रूपयांची वाढ केली आहे. पेट्रोल–डिझेलच्या दरवाढीसोबतच सोमवारी घरगुती गॅस (LPG GAS) सिलेंडरच्या दरातही 50 रूपयांची वाढ केली.
मुंबईत सध्या पेट्रोलचे भाव 111.67 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा भाव 91.42 रुपये प्रति लिटर इतका आहे. तर, देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 97.01 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 88.27 रुपये प्रति लिटर आहे. देशभरातील 11 शहरांमध्ये गॅस सिलेंडरच्या किमती 1 हजार रूपयांच्या पुढे गेल्या आहेत. महाराष्ट्रात नागपुरात घरगुती सिलिंडरचा दर हा मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद या शहरांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. नागपुरात प्रति सिलेंडरचा दर 1001.50 रूपये आहे. तर मुंबईत 949 रुपये, पुण्यात 952.50, नाशिकमध्ये 953, औरंगाबादमध्ये 958.50 रुपये आहे.
रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती चढ्या भावाने मिळत असतानाही गेले 137 दिवस केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत काहीच वाढ केली नव्हती. या दरम्यान 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर इंधन दरवाढ केली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यानुसार सरकारने सलग 2 दिवसात प्रत्येकी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 1.80 रूपयांची वाढ केली.