आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याबाबत तुम्ही बातम्या वाचल्या असतील, त्याबद्दल कारवाई देखील केली असेल. परंतु तुमचे रेशन कार्ड आधार कार्डशी तुम्ही लिंक केलं आहे का ? सरकारने याबद्दल काय माहिती दिली आहे हे तुम्हाला महिती आहे का? जर माहिती नसेल तर ही बातमी तुम्ही वाचलीच पाहिजे कारण वेळेत तुमचे रेशन कार्ड आधार कार्डशी तुम्ही लिंक केले नाही तर तुमचे नुकसान होऊ शकते.
केंद्र सरकारने रेशन कार्डला आधार लिंक करण्याची मुदत 30 सप्टेंबर 2023 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत 30 जून 2023 पर्यंत होती.सदर आदेशाबाबत अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने राजपत्र अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे आता 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नागरिकांना त्यांचे रेशनकार्ड आधार कार्डशी लिंक करता येणार आहे.
काय आहे कारण?
पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी सरकारने वेळोवेळी नागरिकांना आवाहन केले होते. सूचना न पाळल्यास बँक खाते बंद केले जाईल असे देखील सांगण्यात आले होते. त्यामुळे अनेकांनी याकडे गांभीर्याने पाहून आधार आणि पॅन कार्ड लिंक केले. मात्र रेशनकार्डच्या बाबतीत अजूनही गावपातळीवर फारशी जागरूकता दिसत नाहीये.
तसेच गावाखेड्यातील नागरिकांना याकामासाठी अडचणी देखील येत आहेत. एकापेक्षा जास्त शिधापत्रिका रोखण्यासाठी सरकार आधार कार्डशी रेशन कार्ड लिंक करण्याचा आग्रह धरत आहे. एकाच व्यक्तीचे नाव अधिक रेशनकार्डमध्ये आढळल्याची काही प्रकरणे समोर आली होती.
कुटुंबातील लग्न झालेली मुलगी सासरी गेल्यानंतर देखील तिचे नाव माहेरच्या कार्डमधून न वगळणे आणि सासरच्या कार्डात नाव समाविष्ट करून दुहेरी फायदा घेणे अशी काही प्रकरणे समोर आली होती. तसेच कामानिमित्त स्थलांतरित झालेल्या नागरिकांचे नाव शहरातील आणि मूळ गावातील अशा दोन्ही रेशनकार्डमध्ये असल्याचे देखील आढळले होते. एकाच व्यक्तीने असा दुहेरी फायदा घेणे नियमाला धरून नाही.अशा प्रकरणांमुळे गरजू व्यक्तींना सरकारी अन्न-धान्यांची मदत पोहोचत नाही. त्यामुळे यावर उपाययोजना म्हणून सरकारने रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
आधार-रेशन कार्ड लिंक कसे कराल?
गावाखेड्यातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून शासकीय रेशन दुकानातच ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यासाठी रेशनकार्ड धारकांना त्यांच्या रेशनकार्डची झेरॉक्स तसेच रेशनकार्डावर ज्या सदस्यांचे नाव आहे त्या सर्वांच्या आधारकार्डाची झेरॉक्स आणि पासपोर्ट साईझ फोटो रेशन दुकानात जमा कारायचा आहे.
आधार डेटाबेसमधील माहिती प्रमाणित करण्यासाठी तुम्हाला आणि कुटुंबातील सदस्यांना फिंगरप्रिंट देखील द्यावे लागणार आहे. तसेच आधारकार्डशी तुमचा मोबाईल नंबर देखील लिंक असायला हवा हेही लक्षात असू द्या. रेशनकार्ड आधारशी लिंक झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल.
ऑनलाइन लिंक कसे कराल?
- तुमचे आधार कार्ड तुमच्या रेशन कार्डशी ऑनलाइन लिंक करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा-
- तुमच्या राज्याच्या अधिकृत सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) पोर्टलवर जा
- रेशन कार्ड आधार कार्डसह लिंक करण्याचा पर्याय निवडा
- तुमचा रेशनकार्ड क्रमांक टाका, त्यानंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक टाका
- तुमचा नोंदणीकृत मोबाईल फोन नंबर टाका
- Submit या पर्यायावर क्लिक करा
- आता तुमच्या मोबाईलवर एक OTP पाठवला जाईल
- आधार रेशन लिंक पेजवर OTP एंटर करा
- प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला एसएमएस येईल.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत सुरू असलेल्या रेशन दुकानांतून सरकार देशातील सर्व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना रेशनकार्डद्वारे स्वस्तात धान्य आणि रॉकेल देत असते. पासपोर्ट, आधार आणि मतदार ओळखपत्राप्रमाणेच रेशन कार्ड देखील नागरिकांसाठी ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून काम करते. त्यामुळे रेशनकार्डचा गैरवापर होऊ नये यासाठी देखील सरकार प्रयत्नशील आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            