ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले (Pele) यांचं वयाचं 82व्या वर्षी निधन झालं. फुटबॉलमधले गोट म्हणजे ग्रेट ऑफ ऑल टाईम (GOAT) असं त्यांना समजलं जातं. फिफानेही (FIFA) शतकातला सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून त्यांचा गौरव केला आहे. लहानपणी ते गरिबीत वाढले. आणि सॉक्समध्ये सुतळ्या, दोऱ्या भरून ते त्याचा बॉल तयार करून खेळत. तर पायात घालायला बूट नसायचे म्हणून अनवाणी खेळत. आपल्या आजूबाजूच्या मुलांची पहिली स्थानिक फुटबॉल टीम त्यांनी तयार केलं तिचं नावच होतं, ‘शूलेस इलेव्हन’ (Shoeless Eleven)!
ब्राझीलच्या राष्ट्रीय टीममध्ये त्यांची वर्णी लागली तेव्हाही त्यांना फारसे पैसे फुटबॉलमधून मिळत नव्हते. आता लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो अब्जावधीचे करार त्यांच्या फुटबॉल टीमशी करतात, जाहिरातींमधून अब्जावधी रुपये मिळवतात. त्या मानाने पेले याचं आयुष्य आंतरराष्ट्रीय कीर्तीचा फुटबॉलपटू असूनही मध्यमवर्गीय राहणीमानात गेलं. आणि या गोष्टीचं त्यांना शल्यही होतं. फुटबॉलपटूंना निदान घर चालेल इतके पैसे मिळावेत, असं ते बोलून दाखवायचे.
‘मी कारकिर्दीत फुटबॉलमधून फारसे पैसे कमावलेच नाहीत. मला पैसा मिळाला जाहिरातीतून आणि तो ही निवृत्तीनंतर. खरंतर असं असायला नको. फुटबॉलपटू काही 80 वर्षं खेळत नाहीत. त्यांना फुटबॉलमधूनच पुरेसा पैसा मिळाला पाहिजे,’ असं ते बोलून दाखवायचे. आज पेलेंना अपेक्षित होता तो बदल घडलाही आहे.
पण, खुद्द पेलेंना ते फुटबॉल खेळत असेपर्यंत खूपच कमी पैसे मिळाले. 1977 साली पेले फुटबॉलमधून निवृत्त झाले तेव्हा त्यांची एकूण मालमत्ता होती अवघी 60 लाख रुपयांची. त्यामुळे निवृत्तीनंतर त्यांना वेगवेगळे उद्योग करावे लागले. पण, हळू हळू जाहिरातदार त्यांच्यापर्यंत पोहोचले. आणि अखेर त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी 100 दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढे पैसे कमावले होते.
निवृत्तीनंतर पेलेंनी 100 दशलक्ष डॉलर कसे कमावले? How Pele Earned 100 Million USD After Retirement?
पेले खेळत असताना खरंतर सर्वाधिक कमाई करणारे फुटबॉलपटू होते. सँटोस आणि अमेरिकन फुटबॉल लीगमध्येही त्यांचा करार झालेला होता. पण, तेव्हा फुटबॉलपटूंना जास्त मानधन देण्याची पद्धतच नव्हती. त्यामुळे निवृत्तीनंतर पेले चक्क नोकरी शोधत होते.
त्यांनी काही उद्योग करण्याचाही प्रयत्न केला. पण, दुर्दैवाने त्यांचे ते प्रयत्नही फसले. पण, फुटबॉलमध्ये 1,281 गोल करणाऱ्या या फुटबॉलपटूचे दिवस फिरले जेव्हा अमेरिकन जाहिरातदारांनी त्यांना संंपर्क केला. निवृत्तीनंतर त्यांचे कमाईचे स्त्रोत असे होते,
- अटारी सॉकर व्हीडिओ गेमची ते जाहिरात करायचे
- सिल्वेस्टर स्टेलॉन आणि मायकेल केन बरोबर एका हॉलिवूडपटात ते झळकले होते
- हाँगकाँगमध्ये व्हिसा कंपनीचे ते ब्रँड अँबेसिडर होते
- जपानच्या अँटी इन्पोटन्स मोहिनेचे ते ब्रँड अँबेसिडर होते
- पेले फॉरेव्हर या त्यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमाचे हक्क त्यांनी विकले होते
- 2006 च्या फिफा वर्ल्ड कपमध्ये त्यांनी मास्टरकार्डची जाहिरात केली होती
- त्यांनी लिहिलेलं स्वत:चं चरित्र पेले - द बायोग्राफी हे पुस्तक अनेक वर्षं बेस्ट सेलिंग यादीत होतं
- ते गिटार छान वाजवायचे. आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमातून त्यांनी गिटार वादन केलं
- सबवे या अमेरिकन चेनसाठी ते जाहिरात करायचे
1977 मध्ये निवृत्तीनंतर या माध्यमातून त्यांना पैसा मिळाला. आणि त्यांची एकूण मालमत्ता 100 दशलक्ष अमेरिकन डॉलरवर पोहोचली. पण, निवृत्ती नंतरही त्यांना मिळालेल्या जाहिरतींवरून आपल्याला त्यांची लोकप्रियता आणि खेळावरची पकड समजू शकते.