देशातल्या सध्याच्या कर रचनेबाबत (Taxation system) अशनीर ग्रोव्हर यांनी असमाधान व्यक्त केलं आहे. त्यांचं एक विधान सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे. अशनीर ग्रोव्हर यांनी सध्याच्या कर प्रणालीवर जोरदार टीका केल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. आपल्या देशातली सध्याची करप्रणाली अत्यंत गुंतागुंतीची आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले, की करदात्यांना कोणताही लाभ न देता सरकार आपल्या कमाईतला 30 ते 40 टक्के भाग कर म्हणून घेत असते. त्यामुळे अशाप्रकारे कर भरणं खरं तर शिक्षा (Punishment) आहे, असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं आहे.
Table of contents [Show]
'करदाते म्हणजे धर्मादाय काम'
शार्क टँक इंडिया या कार्यक्रमात जज म्हणून राहिलेले अशनीर ग्रोवर यांनी करपद्धतीवर मोकळेपणानं आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले, की करदाते एकप्रकारे देशात धर्मादाय काम करत आहेत. दुसरीकडे या करदात्यांना कोणताही लाभ मात्र सरकारकडून दिला जात नाही. मला माहीत होते, की मी 10 रुपयांपैकी 4 रुपये कमावणार आहे. म्हणजेच तुम्ही काम करत असलेल्या 12 महिन्यांपैकी पाच महिने सरकारसाठी काम करत आहात. हे गणित पाहिलं तर आयुष्यभर तुम्हाला किती वर्षे सरकारची गुलामगिरी करावी लागेल, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. मात्र ही व्यवस्था आपण स्वीकारली आहे, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
'...म्हणून उद्योजक कर भरत नाहीत'
अशनीर ग्रोव्हर पुढे असंही म्हणाले, की उद्योजकांना हे समजलं आहे, त्यामुळे ते कर भरत नाहीत. मात्र पगारदारांना पर्याय नाही. त्यांच्या उत्पन्नावर सरकारकडून टीडीएस कापला जातो. म्हणूनच कर हा शिक्षेपेक्षा कमी नाही. एवढंच नाही, तर तुम्ही 18 टक्के जीएसटी देखील भरत आहात. मग प्रश्न पडतो, की तुम्ही असं कोणासाठी जगत आहात, असा सवाल त्यांनी केला आहे.
कर दर निश्चित करण्याचं मत
अशनीर ग्रोव्हर यांनी सरकारच्या या करपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या दुसर्या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलं आहे, की जर आपण राजकारणी झालो तर आयकर दर कमी करणं हीच सर्वात मोठी प्राथमिकता असेल. जर सरकारनं 10 ते 15 टक्के कर दर निश्चित केला आणि कोणालाही कर चुकवण्याची परवानगी दिली नाही, तर सरकारला करातून अधिक उत्पन्न मिळू शकेल, असं त्यांना वाटतं.
You Work 3-5 Months for the Government if you fall in the 30% Income Tax Bracket
— Ravisutanjani (@Ravisutanjani) June 10, 2023
क्रेडिट कार्डवरच्या खर्चावरील टीडीएस धोरणावर टीका
मागच्या महिन्यात अशनीर ग्रोव्हर यांनी आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्डवरच्या खर्चावर 20 टक्के डीटीएस आकारण्याच्या सरकारच्या अधिसूचनेवरदेखील जोरदार टीका केली. राजकीय देणग्यांवर करमाफी मिळते, असं ते उपरोधिकपणे म्हणाले.
अशनीर ग्रोवर यांची पार्श्वभूमी अन् वादग्रस्त मुद्दे
दिल्लीत जन्मलेल्या अशनीर ग्रोवर यांनी दिल्ली आयआयटीमधून बी. टेक. पूर्ण केलं आहे. इन्व्हेस्ट बँकिंगमध्ये व्हीपी म्हणून त्यांनी काही काळ काम पाहिलं. भारतपेचे ते सहसंस्थापक आहेत. शाश्वत नाक्राणी यांच्यासोबत 2018ला त्यांनी याची स्थापना केली. दरम्यान, मागच्या महिन्यात 81 कोटींच्या उधळपट्टीच्या आरोपावरून त्यांच्यावर एफआयआर दाखल झाला होता.