Allegation Of 81 Crore Scam: भारतपे चे माजी व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोवर यांच्यावर कंपनीच्या 81 कोटी रुपयांच्या निधीची उधळपट्टी केल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपाची दखल घेत त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी (दि. 10 मे) अश्नीर ग्रोवरविरोधात एफआयआर दाखल केला आहे. अश्नीर ग्रोवरसह त्याची पत्नी माधुरी जैन-ग्रोवर आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य दीपक गुप्ता, सुरेश जैन आणि श्वेतांक जैन यांचीही एफआयआरमध्ये नावे घेण्यात आली आहेत.
विविध कलमान्वये गुन्हा दाखल
अश्नीर ग्रोवर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये आठ गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्यावर कलम 409, 420, 467 आणि 120बी सारखी कलमे लावण्यात आली आहेत. आर्थिक गुन्हे शाखेकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर अश्नीर ग्रोवरवर लावण्यात आलेल्या आरोपांची चौकशी सुरू करण्यात आली होती.
अश्नीरसह कुटुंबातील इतर व्यक्तीही दोषी
अश्नीर ग्रोवरच्या विरोधातील तक्रारींची तपासणी केल्यानंतर, अश्नीर ग्रोवरसह एफआयआरमध्ये समाविष्ट असलेल्या इतर व्यक्ती देखील सर्व कलमांखाली दोषी आढळून आल्या आहेत. जानेवारी 2022 मध्ये अश्नीर यांनी भारतपे मध्ये आर्थिक अनियमितता केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर मार्च 2022 मध्ये त्यांना भारतपे मधून काढून टाकण्यात आले होते. तेव्हा पासून अश्नीर ग्रोवर हे अनेक कायदेशीर खटल्यांमध्ये अडकले आहे.
अश्नीर ग्रोवर यांची पार्श्वभूमी
अश्नीर ग्रोवर यांचा जन्म दिल्लीत झाला असून, त्यांनी आयआयटी दिल्लीमधून बीटेकची पदवी घेतली आहे. अश्नीर यांनी मे 2006 ते मे 2013 पर्यंत कोटक इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये VP म्हणून काम केले आहे. 2018 मध्ये त्यांनी शाश्वत नाक्राणी यांच्यासोबत भारतपे ची स्थापना केली. भारतपे हे भारतातील लहान व्यापारी आणि किराणा दुकानांना व्यवसाय करतांना डिजिटल पेमेंट प्राप्त करण्यास मदत करणारे एक डिजिटल पेमेंट माध्यम आहे. भारतपे ला त्याच्या वापरकर्त्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून, गेल्या पाच वर्षात भारतपे ने डिजिटल पेमेंट व्यवसायात मोठे नाव कमावले आहे.