देशातील प्रत्येक राज्याला ‘वंदे भारत ट्रेन’ मिळावी असे वाटतेय. प्रत्येक राज्य सरकार यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना निवेदन देताना दिसतायेत. अशातच भारतीय रेल्वेने महाराष्ट्रातील नागपूर ते छत्तीसगडच्या बिलासपूर मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस रद्द केली आहे.
डिसेंबर 2022 मध्ये खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ट्रेनचे लोकार्पण करण्यात आले होते. या लोकार्पण सोहळ्याला 6 महिने पूर्ण होताच सदर वंदे भारत ट्रेन रद्द करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.
स्थानिक मिडीया रिपोर्टनुसार, या मार्गावरील प्रवासासाठी ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. प्रवाशांच्या कमतरतेमुळे ही ट्रेन रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या मार्गावर आता तेजस ट्रेन चालवली जाणार असल्याची माहिती देखील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
तेजस एक्स्प्रेस ही भारतातील सर्वात वेगवान ट्रेन म्हणून सुरू करण्यात आली होती, परंतु नंतर ‘वंदे भारत’ ट्रेन सुरु झाल्यानंतर देशातील सर्वात वेगवान ट्रेन म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. नागपूर ते बिलासपूर वंदे भारत ट्रेनच्या रेकचा उपयोग तिरुपती-सिकंदराबाद मार्गावर केला जाणार आहे. सध्या देशभरात 19 वंदे भारत ट्रेन सुरु असून त्यांची संख्या आता 18 होणार आहे. तसेच महाराष्ट्रात 5 वंदे भारत ट्रेन सुरु होत्या, आता त्यांची संख्या 4 वर येणार आहे.
महागड्या तिकीटदरामुळे प्रवाशांनी फिरवली पाठ!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2022 मध्ये नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण केले होते. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावर वंदे भारत ट्रेनला सर्वात कमी प्रतिसाद मिळण्याचे कारण म्हणजे महागडे तिकीट हे आहे. बिलासपूर-नागपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसमध्ये एक्झिक्युटिव्ह क्लासच्या तिकिटाची किंमत 2,045 रुपये इतकी आहे, तर एसी चेअर कारच्या तिकिटाची किंमत प्रति व्यक्ती 1,075 रुपये इतकी आहे. साधारण ट्रेनने या मार्गावरील प्रवास केवळ 200 रुपयांमध्ये करता येतो.
महागडे तिकीट दर असल्यामुळे प्रवाशांनी वंदे भारत ट्रेनकडे पाठ फिरवल्याचे दिसते आहे. गेल्या एकाही महिन्यांपासून नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस 50% क्षमतेने सुरु होती. प्रवाशांची कमतरता असल्यामुळे ट्रेनचा परिचालन खर्च देखील भागत नव्हता. त्यामुळे या मार्गावरील ट्रेन रद्द करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे.