IFFCO Drone: भारतामध्ये ड्रोन निर्मिती कंपन्यांना चांगले दिवस आले आहेत. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यापासून अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रात ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर वाढत आहे. फूड डिलिव्हरी, औषधांची डिलिव्हरीसाठी ड्रोनचा वापर मागील काही वर्षांपासून सुरू झाला आहे. आता कृषी क्षेत्रात नॅनो फर्टिलायझर साठी ड्रोनचा वापर वाढत असल्याचे दिसून येत आहे. इफ्को या सहकारी क्षेत्रातील खत निर्माण संस्थेने 400 ड्रोनची ऑर्डर दिली आहे.
पारस डिफेन्स आणि स्पेस टेक्नॉलॉजी या कंपनीला ड्रोन पुरवठा करण्याचे कंत्राट मिळाले आहे. 400 ड्रोनच्या या कंत्राटाची किंमत 42 कोटी रुपये आहे. यामध्ये दोन वर्षांसाठी ड्रोनचा देखभाल आणि प्रशिक्षण खर्चाचा समावेश आहे. कृषी क्षेत्रातील कंपन्यांना ड्रोन तंत्रज्ञानाबाबत उत्सुकता आहे. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंतही पोहचले आहे. परवडणाऱ्या किंमतीत ड्रोनची निर्मीती झाली तर खत फवारणीसाठी शेतकऱ्यांकडे सर्सास ड्रोन दिसतील.
इफ्कोकडून कंत्राट मिळताच पारस डिफेन्स कंपनीच्या शेअर्सचा भावही वधारला. काही दिवसांपूर्वी पारस कंपनीला संरक्षण खात्याच्या रिसर्च लॅबोरेटरीचे 53 कोटी रुपयांचे ड्रोनचे कंत्राट मिळाले. देशाची संरक्षण सुविधा आणखी मजबूत करण्यासाठी या ड्रोन्सचा वापर करण्यात येणार आहे.
भारतामध्ये सध्या शेतीसाठी ड्रोन फवारणीचा व्यवसाय वाढत आहे. पिकांवर औषध फवारणी करण्यासाठी भाड्याने ड्रोनही मिळत आहेत. भविष्यात ड्रोनचा वापर वाढू शकेल. मात्र, त्यासाठी ड्रोनच्या किंमती आणि फवारणी खर्च कमी झाला तर पारंपारिक पद्धतीने होणारी खत फवारणी मागे पडू शकते. सरकार द्वारे ड्रोन निर्मिती कंपन्यांना अनुदानही देण्यात येत आहे.