Amravati orange turnover: विदर्भात संत्राचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. विदर्भातील 22 हजार कुटुंब संत्रा उत्पादनावर अवलंबून आहे. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी महामनीने चर्चा केली असता ते सांगतात की, आमच्या भागात संत्रा उत्पादन अधिक होते त्यामुळे आमच्या सारखे धनवान शेतकरी कुठेच नाही, पण आमच्या शेतमालाचा भाव आम्ही ठरवू शकत नाही ही फार मोठे दुर्दैव आहे.
पुढे ते सांगतात, विदर्भात 1 लाख 26 हजार हेक्टर क्षेत्रावर संत्रा उत्पादन घेतले जाते. त्यातील 78 हजार 245 हेक्टर क्षेत्र एकट्या अमरावती जिल्ह्यातील आहे. त्यातील 28 हजार हेक्टर वरुड तर 18 हजार हेक्टर मोर्शी येथील क्षेत्र संत्र पिकाणे व्यापले आहे. म्हणजेच एकूण 36 हजार हेक्टर क्षेत्र मोर्शी आणि वरुड तालुक्याने व्यापले आहे.
वरुडमधील 28345 हेक्टर उत्पादन क्षेत्रामधून 19600 क्षेत्रातील उत्पादन 2 ते 2. 25 लाख मेट्रिक टन इतके असते. सव्वा लाख मेट्रिक टन आंबिया बहार तर 1 लाख मेट्रिक टन मृग बहार असे उत्पादन एकट्या वरुड तालुक्यात घेतले जाते.
वरुडलाच विदर्भाचा कॅलिफोर्निया असे म्हणतात. तेथील शेतकरी महेंद्र देशमुख महामनीशी चर्चा करतांना सांगतात, एक एकरमध्ये 100 ते 125 झाडे लावता येतात. त्यांना वाढ होण्यासाठी आणि बहरण्यासाठी 5 वर्ष लागतात. 5 वर्ष त्या झाडांना खत पाणी घालून लक्ष देऊन त्याची काळजी घ्यावी लागते. या मेहनतीनंतर त्यातुन 10 ते 14 टन संत्रा उत्पादन मिळते.
संत्राचा भाव कसा ठरवला जातो..
मार्केटमध्ये असलेल्या संत्राच्या मागणीवरून त्याचा दर ठरवला जातो. त्याची 2 प्रकारे विक्री केली जाते. किलोप्रमाणे भाव आणि कॅरेटप्रमाणे भाव. या दोन्हीचा चालू असलेला भाव दिला जातो. किलो प्रमाणे विक्री करणारा शेतकरी जास्त नफा मिळवतो. असे असले तरी संत्राची क्वालिटी सुद्धा फार महत्वाची आहे.
रसाळ, गोड आणि मोठा संत्रा असेल तर त्याला योग्य भाव दिला जातो आणि त्यात बारीक, आंबट आणि गळतीला आलेला असेल तर त्याच्या दरावर परिणाम होतो. किलो प्रमाणे म्हणजेच त्यात टनाने माल घेतला जातो. हुंड्यात सुद्धा व्यापारी मालाची खरेदी करतात. उदा. 40 ते 45 रुपये किलोने विकलेला संत्रा एक कॅरेटमध्ये 20 किलो बसतो म्हणजेच ते कॅरेट 800 रुपयाला पडते, कॅरेटने दिलेला संत्रा 400 ते 600 रूपयांच्या वर जात नाही.
म्हणजेच अमरावती जिल्ह्यात संत्राचे उत्पादन 10 लाख मेट्रिक टनाच्या वर होते. त्याची वार्षिक उलाढाल ही करोडो रुपयाची असते. ही निश्चित आकड्यांमध्ये सांगता येणार नाही पण उत्पादन बघता व्यापऱ्यानी सांगितलेल्या माहितीवरून हा अंदाज निघतो. निसर्गाने साथ दिली तर यात वाढ आणि निसर्गाची अवकृपा झाली तर यात घटही होत राहते.
5 ते 6 महीने मजूर वर्गाला रोजगार..
संत्रा उत्पादन क्षेत्र अधिक असल्याने विदर्भात मजुरांना रोजगार सहज प्राप्त होतो. विदर्भातील 50 टक्के लोकसंख्या ही मजुरीवर अवलंबून आहे. संत्रा उत्पादन घेत असतांना 5 ते 6 महीने मजुरांना त्यातुन रोजगार प्राप्त होतो. फवारा देणे, पाणी देणे, खुरपी करणे, खत देणे, बेगण्या बांधणे, बोर्डिंग करणे, साल मोडणे इत्यादि कामे मजुरांना करायला मिळतात आणि त्यातुन रोजगार प्राप्त होतो.
विक्री आणि वॅक्सिनबाबत बोलतांना व्यापारी सांगतात..
शेतात माल आल्यानंतर शेतकरी त्याला बांबूच्या सहाय्याने बांधून आधार देतात. संत्रा विक्रीसाठी काढल्यानंतर व्यापारी त्याला करंट रेटमध्ये खरेदी करतात. त्यामध्ये तीन भाग होतात, सर्वात चांगल्या क्वालिटीचा मध्यम क्वालिटीचा, बारीक राहलेला या तीन भागाचे रेटही तीन प्रकारे देतात. उदा. एक नंबर संत्रा जर 35000 रुपये टन असेल, तर दोन नंबर संत्रा 30000 रुपये आणि सर्वात बारीक 21000 रुपये याप्रमाणे भाव देवून खरेदी करतात.
व्यापारी बाजारपेठेमध्ये हाच संत्रा 30000 रुपये टन असा विकतो. बाजारपेठेत जाण्याआधी संत्राला वॅक्सिन केले जाते. पॉलिश करून मालाची छाटणी केली जाते, त्यानंतर बाजारपेठेत ग्राहकांना विकल्या जातो.