तुमचे वीज बिल थकले आहे का? तुम्ही एवढ्यात तुमचे थकलेले वीज बिल भरण्याची तयारी करत आहात का? तुम्ही रोखीने वीज बिल भरणा करण्याच्या तयारीत आहात का? जर या प्रश्नांची उत्तरे ‘हो’ असतील, तर थांबा! ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण, राज्य वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार वीज बिल भरणा करण्याच्या प्रक्रीयेबाबत काही नवे नियम लागू करण्यात येणार आहेत. तेव्हा वीज बिल भरणा करण्याआधी हे नवे नियम काय आहेत हे आधी जाणून घ्या.
5 हजारापर्यंतचे बिल रोखीने!
राज्य वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार ग्राहकांना येत्या 1 ऑगस्ट 2023 पासून केवळ पाच हजार रुपये पर्यंतची वीज बिले रोखीने भरता येणार आहेत. ज्या ग्राहकांची वीज बिले 5 हजारांपेक्षा अधिक असतील त्यांना ऑनलाइन पद्धतीने वीज वितरण कंपनीच्या खात्यात पैसे जमा करावे लागणार आहेत. त्यामुळे तुमची काही थकबाकी असेल आणि तुम्ही रोखीने व्यवहार करण्याच्या तयारीत असाल तर 1 ऑगस्टच्या आत तुम्ही तुमचे वीज बिल भरायला हवे.
ऑनलाइन वीज बिल भरणा केल्यास सवलत!
जे गग्राहक ऑनलाइन वीज बिल भरणा करणार आहेत त्यांना वीज बिलात 0.25% सवलत दिली जाईल असे देखील राज्य वीज नियामक आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे ग्राहकांना या योजनेचा चांगला फायदा मिळू शकतो. बचतीचा हा एक उत्तम मार्ग ठरू शकतो. वीज बिलावर 0.25% सवलत ही कमी वाटत असली तरी, ज्यांची वीज बिले जास्त असतील त्यांना तर नक्कीच याचा फायदा जाणवणार आहे. तसेच सामन्य ग्राहकांना देखील वीज बिलात 10-20 रुपये जरी कमी झाले तरीही ते स्वागतार्ह्यच राहणार आहे हे नक्की!
‘गुगल पे’ वर अडचण!
महावितरणने ऑनलाइन पेमेंटची सुविधा सुरू केल्यापासून अनेक ग्राहकांनी वीज कार्यालयात जावून, रांगा लावून बिल भरण्यापेक्षा ऑनलाइन पेमेंटचा मार्ग स्वीकारला होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून गुगल पे या UPI पेमेंट सर्विसने एकावेळी केवळ 2 हजार रुपयांचे व्यवहार करण्याचे निर्बंध आणल्यामुळे, ज्या ग्राहकांचे वीज बिल 2 हजारांपेक्षा अधिक आहे त्यांना UPI पेमेंटने वीज बिल भरणा करता येत नाही. अशा ग्राहकांना पुन्हा एकदा वीज मंडळाच्या कार्यालयात जावून बिल भरावे लागत आहेत. तसेच ज्या ग्राहकांनी वेगवगेळ्या UPI पेमेंटच्या आणि बँक ॲपच्या मदतीने बिल भरणा केला आहे, त्यांचे बिल अपडेट न झाल्याच्या तक्रारी देखील वाढल्या आहेत.