Online Gambling: जुगार हा खेळ तसाही आपल्याकडे बदनाम आहे. पैसे लावून खेळ खेळणे हे सभ्यपणाचे लक्षण मानले जात नव्हते. परंतु अलीकडे ऑनलाईन गेम्सच्या संख्या वाढत गेल्या आणि लोक पैसे लावून गेम खेळू लागले. यांत अनेकांनी आपले पैसे गमावले देखील आहेत. याच सगळ्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू राज्याने ऑनलाईन जुगार खेळण्यावर बंदी आणली आहे.
तामिळनाडू राज्याचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी याबाबतच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी विधानसभेत 'ऑनलाइन जुगार प्रतिबंध आणि ऑनलाइन गेम्सचे नियमन' विधेयक आणले होते. या विधेयकाला राज्यपालांनी मंजुरी दिली आहे.
काय सांगतो कायदा?
तामिळनाडू राज्यात ऑनलाईन जुगार खेळण्यास पूर्णतः बंदी असेल. ऑनलाईन जुगारीच्या जाहिराती देखील कंपन्यांना देता येणार नाहीयेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा 10 लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही स्वरूपाच्या शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात केली गेली आहे.
तसेच इतर ऑनलाईन गेम्सवर मात्र बंदी आणलेली नाही. इतर ऑनलाईन गेम्स संदर्भात एक समिती नेमण्याचा निर्णय सरकारने घेतला असून या समितीच्या शिफारशी स्वीकारल्या जाणार आहेत. ऑनलाईन गेम्ससाठी नियमावली ठरविण्यासाठी ही समिती काम करेल. या समितीचे अध्यक्षपदी निवृत्त सनदी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार आहे. सोबतच समितीत निवृत्त पोलीस महानिरीक्षक व इतर क्षेत्रातील जाणकार देखील असतील अशी माहिती तामिळनाडू सरकारने दिली आहे.
#TamilNadu’s law banning online gambling— Rummy & Poker (recognised as online games of change)— published in the Gazette.
— Divya Chandrababu (@bydivyac) April 11, 2023
More than 90% of public—that is, 10,708 out of 10,735 e-mails sent to the government— had requested for imposing a total ban on online games. pic.twitter.com/xx2S0nunM6
जाहिरातीसाठी देखील बंदी
तामिळनाडू सरकारने ऑनलाईन जुगार खेळ चालवणाऱ्या गेमिंग कंपन्यांच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या आहेत. ऑनलाईन जुगार गेम्सचा प्रचार-प्रसार करण्यास देखील बंदी असणार आहे. राज्य सरकारने प्रकाशित केलेल्या राजपत्रात असा उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे 'रम्मी' आणि 'पोकर' या ऑनलाईन गेम्सचा स्पष्ट उल्लेख केला गेला आहे.
जाहिरातीसंदर्भात असलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस एक वर्षांचा कारावास आणि पाच लाखांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो. काही प्रकरणात दोन्ही शिक्षा दिल्या जाऊ शकतात.
तामिळनाडूमध्ये नवीन कायद्यानुसार, पैसे किंवा पैज लावून ऑनलाइन जुगार किंवा गेम खेळणाऱ्या व्यक्तीस तीन महिन्यांपर्यंत कारावास, किंवा 5,000 रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तसेच ऑनलाइन जुगार सेवा पुरवणारी कोणत्याही व्यक्तीला तीन वर्षांपर्यंतचा कारावास किंवा दहा लाख रुपयांपर्यंतचा दंड, किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
सामान्य नागरिकांनी निर्णयाचे केले स्वागत
ऑनलाईन जुगार स्वरूपातील गेम्स संदर्भात भारतीय कायदे स्पष्ट नाहीत ही मुख्य अडचण आहे. ऑनलाईन गेम्समधून मोठा महसूल मिळतो, रोजगार निर्मिती होते असे म्हणत 2018 साली भारत सरकारने ऑनलाईन गेम्सला परवानगी दिली होती. परंतु प्रत्यक्षात मात्र तरुणवर्ग ऑनलाईन गेम्सच्या आहारी जाताना दिसतो आहे. आर्थिक गैरव्यवहार देखील याद्वारे मोठ्या प्रमाणात चालत असल्याच्या तक्रारी सामान्य नागरिकांनी सरकारकडे नोंदवल्या होत्या. तामिळनाडू सरकारने ऑनलाईन जुगार गेम्सवर बंदी घातल्यानंतर सामान्य नागरिकांनी,विशेषतः पालक वर्गाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.