गेल्या काही दिवसांपासून एकीकडे टोमॅटोचे भाव गगनाला भिडले असताना आता कांद्याचे भाव देखील वाढले आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्यामुळ येणाऱ्या काही दिवसात तुम्हांला देखील कांदे खरेदी करताना अधिकचे पैसे मोजावे लागू शकतात. 40 ते 50 रुपये किलो रुपये दराने असलेले कांदे सध्या 60 ते 70 रुपये दराने मिळतायेत. येत्या काही दिवसांत ग्राहकांना ही भाववाढ सहन करावी लागेल मात्र लवकरच नवीन आवक बाजारात दाखल होण्याची शक्यता असल्याने ही भाववाढ फार काळ राहणार नाहीये.
क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स अँड ॲनालिटिक्सच्या अहवालानुसार, ऑगस्ट अखेरीस कांद्याचे वाढलेले भाव पुन्हा पूर्वपदावर येण्याची चिन्हे आहेत. ऑक्टोबरपासून खरीपाची आवक सुरू झाल्यावर कांद्याचा पुरवठा चांगला होईल, आणि मागणी व पुरवठ्याचे गणित जुळून येईल असे या या अहवालात म्हटले आहे. मात्र महाराष्ट्रासह अन्य भागात अजूनही पावसाचा जोर कायम आहे. लासलगाव, नाशिक, सटाणा जिल्ह्यातून महाराष्ट्राला सर्वाधिक कांद्याचा पुरवठा होत असतो. या भागातही अजून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे दळणवळणाची यंत्रणा अजूनही पूर्णपणे सुरळीत नाहीये. त्यामुळे पावसाचा जोर कमी झाला आणि खरीपाची पिके बाजारात आली की भाववाढ नियंत्रणात येऊ शकते.
#Tomato नंतर #कांद्याच्या किमती ऑगस्ट अखेरीस वाढणार!
— Sagar Bhalerao (@SagarMahamoney) August 5, 2023
देशभरात आत्तापर्यंतची सरासरी किंमत 60 रुपये-70 रुपये?#OnionPriceHike #onion pic.twitter.com/jR5MfyIl1s
ऑक्टोबरपासून खरीपाचे पिक
येत्या ऑक्टोबरपासून बाजार समित्यांमध्ये कांद्याचे खरीप पिक येण्याची शक्यता आहे. यावर्षी कांद्याची पेरणी समाधानकारक झाली असून मुबलक माल बाजारात येऊ शकतो. रब्बी हंगामाचा माल लवकर संपल्यामुळे महिनाभर ग्राहकांना कांद्याची भाववाढ सहन करावी लागणार आहे. मात्र ऑक्टोबर पासून खरिपाचे पिक बाजारात आल्यानंतर किंमती घटण्याची चिन्हे आहेत.
टोमॅटोची भाववाढ थांबेना!
मुंबई, पुण्यात अजूनही टोमॅटो 140-150 रुपये किलो दराने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. महाराष्ट्रात अजूनही टोमॅटोच्या पिकाची आवक वाढलेली नाहीये. तर दुसरीकडे दिल्ली-एनसीआर परिसरात टोमॅटोचे भाव 300 रुपये किलो पार जाण्याची शक्यता आहे. नाबार्डच्या मदतीने केंद्र सरकारने अनुदानित टोमॅटोची विक्री सुरु केली असली तरी नाबार्डला देखील टोमॅटो खरेदी करण्यास अडचणी येत आहेत.