वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्ये सोन्याच्या किमती सातत्याने वाढ होत आहे.आज, मंगळवारी सोन्याच्या किमतीने पुन्हा नवा उच्चांक गाठला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, 24 जानेवारी रोजी सराफा बाजारात सोने 312 रुपयांनी महागले आणि 57 हजार 362 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले. यापूर्वी सोन्याने 20 जानेवारीला उच्चांक गाठला होता, त्यावेळी सोने 57 हजार 50 रुपये इतके होते.
जानेवारीत सोने 2,400 रुपयांनी महागले!
जानेवारी महिन्यात आतापर्यंत सोने 2,427 रुपयांनी महागले आहे.सोने महागाईचा हा एक उच्चांकच म्हणावा लागेल. या महिन्याच्या सुरुवातीला ते 54 हजार 935 रुपये इतके होते, ते आता 57 हजार 362 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. वर्षअखेरीस सोन्याच्या किमती 64 हजारांवर जाऊ शकतात.
चांदीचे दर घसरले!
चांदीबद्दल बोलायचे झाले तर आज चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सराफा बाजारात चांदीचे दर 267 रुपयांनी घसरून 68 हजार 6 रुपये प्रतिकिलो इतका झाला आहे. 23 जानेवारीला चांदीचे दर 68 हजार 273 हजारांवर होते.
2023 अखेरीस सोन्याचे भाव 64,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतात!
आर्थिक अनिश्चिततेच्या काळात, RBI सारख्या जगभरातील केंद्रीय बँकांनी सोन्याचा साठा वाढवला आहे. केडिया एडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांच्या मते, केंद्रीय बँकांकडून सोन्याची वाढती खरेदी हे सकारात्मक लक्षण आहे. त्यामुळे सोने व्यापाराला आधार मिळेल. अजय केडिया पुढे म्हणाले की, 2023 च्या अखेरीस सोने 64,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. दागिने खरेदी करण्याच्या बाबतीत, चीन (वार्षिक 673 टन) नंतर भारत (वार्षिक 611 टन) हा जगातील दुसरा सर्वात मोठा सोन्याचे दागिने खरेदी करणारा देश आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या (World Gold Counselling) ताज्या अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे. यानुसार भारतातील दागिन्यांच्या विक्रीत बांगड्या आणि सोनसाखळ्यांचा वाटा सर्वाधिक 60% इतका आहे.