ऑनलाईन टॅक्सी सेवांपासून (Online Cab Service) सुरुवात करणारी ओला कॅब्ज (Ola Cabs) ही स्टार्टअप कंपनी (Startup) म्हणता म्हणता ई-वाहनांच्या (Electric Vehicle) क्षेत्रातही नवीन क्षितीजं काबीज करताना दिसतेय. ई-टू व्हीलरच्या (Two-Wheeler) निर्मितीबरोबरच कंपनी आता या वाहनांसाठी लागणाऱ्या बॅटरीचे लिथिअम आयनही (Lithium Ion Cell) तयार करणार आहे.
याखेरीज 2023 सालासाठी कंपनीच्या आणखीही मोठ्या योजना आहेत. आणि यातली एक आहे ओला कॅब्जचा आयपीओ (Ola Cabs IPO). आणि कंपनीला पुढच्या आर्थिक वर्षांत पहिल्याच तिमाहीत चक्क युरोपीयन बाजारपेठेत प्रवेश करायचाय.
इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात सध्या गरज आहे ती वाहनांना लागणाऱ्या बॅटरींची. आणि या बॅटरीतला महत्त्वाचा भाग आहे लिथिअम आयन सेल. भारताला सध्या या भागासाठी चीन, जपान, तैवान किंवा दक्षिण कोरियावर अवलंबून राहावं लागतं. पण, हे अवलंबित्व नवीन वर्षात कमी करण्याचा ओला कंपनीचा इरादा आहे.
‘पुढच्या वर्षी तामिळनाडूच्या कृष्णगिरी इथल्या कारखान्यात लिथिअम आयन सेलचं उत्पादन सुरूही होईल. आणि ते झालं की, आम्ही देशातले सगळ्यात मोठे आणि पहिले लिथिअम सेल उत्पादक असू. ही कल्पना कंपनीसाठी सुखावणारी आहे. मागची दोन वर्षं आम्ही या प्रकल्पावर मेहनत घेतोय,’ असं ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक आणि सीईओ भाविष अगरवाल यांनी सांगितलं.
तामिळनाडू प्रकल्पाची सुरुवातीची क्षमता 5 गिगावॅट्स इतकी असेल.
लिथिअम आयन सेल का महत्त्वाचा? How Important is This Project?
भारत आणि जागतिक स्तरावरही आता येणारे दिवस इलेक्ट्रिक वाहनांचे असतील. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी अख्खं जग कटीबद्ध आहे. आणि त्यामुळे हे बदल होतायत. पण, अशावेळी इ-वाहनांना लागणाऱ्या बॅटरीची मागणी देशात वाढतेय.
या बॅटरीमध्ये लागणारा लिथिअम आयन सेल हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि जाणकारांच्या मते, या भागाचं उत्पादन भारतात सुरू झालं तर बॅटरीचा 40-50% खर्च कमी होऊ शकेल. ओला कंपनीने अलीकडेच बॅटरी उत्पादन आणि त्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्यासाठी 500 दशलक्ष अमेरिकन डॉलरची गुंतवणूक केली आहे.
सुरुवातीला या प्रकल्पात तयार होणारी बॅटरी ही अर्थातच, फक्त ओलाच्या टू-व्हीलरसाठी वापरल्या जातील. पण, हळू हळू प्रकल्पाची क्षमता वाढली की, त्यांची बाहेर विक्री करण्याचाही कंपनीचा मानस आहे.
ओला आयपीओ आणि युरोपीयन बाजारपेठ OLA IPO & European Market
2023-24 या आर्थिक वर्षांत ओला कंपनीने इतरही विस्ताराच्या योजना आखल्या आहेत. ओला इलेक्ट्रिक ही कंपनी पुढच्या वर्षी नफा कमावायला लागेल. आणि त्यानंतर आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीला युरोपच्या बाजारपेठेत आपला विस्तार करायचा आहे. तर ओला कॅब्ज या ऑनलाईन टॅक्सी सेवेचा आयपीओ बाजारात आणण्याचाही कंपनीचा विचार आहे.
नवीन वर्षांत ओलाच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलरची नवीन काही मॉडेल बाजारात येणार आहेत. आणि सगळं योजने बरहुकूम घडलं तर कंपनी 2024 मध्ये इलेक्ट्रिक कारच्या क्षेत्रातही दिसू शकते.
ओला इलेक्ट्रिक कंपनी दर दिवशी 10,000 इलेक्ट्रिक टू-व्हीलर बनवते.