आर्थिक निर्णय घेणे हे कठीण काम असते. विशेषकरून, दोन गोष्टींपैकी एकाची निवड करणे अवघड असते. मात्र, नज सिद्धांताच्या माध्यातून योग्य गोष्टीची निवड करता येऊ शकते. सर्वसाधारणपणे अल्पकालीन समानाधानासाठी तात्पुरते निर्णय घेत असतो. मात्र, यावर नियंत्रण मिळवून योग्य निर्णय घेतल्यास दीर्घकालीन फायदे होऊ शकतात. तुम्ही देखील नज सिद्धांताचे अनुसरण केल्यास आर्थिक स्थितीमध्ये मोठे बदल घडवू शकता. बचतीच्या माध्यातून दीर्घकालीन उद्देश गाठण्यास याद्वारे मदत होऊ शकते.
नज सिद्धांत वापरून सरकार, संस्था, कंपन्या, नेते देखील लोकांना एखाद्या गोष्टीची निवड करण्यासाठी निर्देशित करतात. भारत सरकारने देखील वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व नागरिकांना या योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी नज सिद्धांताचा वापर केला आहे.
नज सिद्धांत नक्की काय आहे, याचा तुमच्या वैयक्तीक आयुष्यात बदल करण्यासाठी कसा फायदा होऊ शकतो, आर्थिक स्थिती सुधारण्यास कशाप्रकारे मदत होऊ शकते ? या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखातून समजून घेऊयात.
नज सिद्धांत काय ?
नजचा शब्दशः अर्थ आहे ‘ हलके ढकलणे ’ . मात्र, मानसशास्त्र आणि वर्तणुकीचे अर्थशास्त्राच्या दृष्टीने नज सिद्धांताचा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे. नज सिद्धांत सर्वात प्रथम 2008 साली अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड थॅलर यांनी मांडला. ‘Nudge: Improving Decisions About Health, 'Wealth, and Happiness' या त्यांच्या पुस्तकापासून हा सिद्धांत लोकप्रिय झाल्याचे पाहायला मिळते. वर्तणुकीच्या अर्थशास्त्रातील योगदानासाठी त्यांना 2017 सालचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार देखील मिळाला आहे.
नज सिद्धांत हा तुम्हाला योग्य गोष्टींची निवड करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे काम करतो. व्यक्तीला आपल्या व्यवहारांमध्ये आवश्यक असलेले सकारात्मक बदल करण्यासाठी प्रेरित करतो.
आपण कोणत्याही गोष्टी ठरवताना सहज निर्णय घेऊन मोकळे होतो. कोणत्याही परिणामांचा विचार न करता सरळ-सोप्या गोष्टीची निवड करतो. परंतु, नज सिद्धांताच्या माध्यातून अशा गोष्टी टाळून तुमच्यासाठी योग्य असलेल्या गोष्टींची निवड करता येते. या सिद्धांताच्या माध्यातून कोणताही दबाव न टाकता फायदेशीर व्यवहार करण्यासाठी प्रेरित केले जाते.
हाच सिद्धांत तुम्ही घेत असलेल्या आर्थिक निर्णयांना देखील लागू करू शकता. एकप्रकारे, नज सिद्धांत चांगले आर्थिक निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहित करतो. थोडक्यात, तुम्हाला योग्यप्रकारे बचत, खर्च-भांडवलाची मांडणी, गुंतवणुकीचे योग्य निर्णय घेण्यास नज सिद्धांताच्या माध्यमातून मदत होऊ शकते.
तुमचा आर्थिक उद्देश साध्य करण्यासाठी व बचत जास्त व्हावी यासाठी नज सिद्धांताचा कशाप्रकारे वापर करू शकता, याचे उदाहरण समजून घेऊया.
समजा, तुम्हाला दरमहिन्याला ठराविक रक्कम बचत करायची आहे. अशावेळी तुम्ही तुमच्या पगारातून काही रक्कम आपोआप बचत खात्यात किंवा ठेवीमध्ये जमा होईल अशा योजनांची निवड करू शकता.
भारत सरकारद्वारे नज सिद्धांताचा वापर
केंद्र सरकारद्वारे नज सिद्धांताचा वापर वेगवेगळ्या योजनांमध्ये लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सरकारने विविध उपक्रमांमध्ये या सिद्धांताचा वापर केला असल्याचे सांगितले. निर्मला सीतारमण म्हणाल्या की, नज सिद्धांताचा वापर भारताच्या गरजेनुसार आर्थिक गतिविधिला चालना देण्यासाठी टूलप्रमाणे केला जात आहे.
यासाठी त्यांनी सरकारच्या बेटी बचाओ, बेटी पढाओ, पीएम स्वनिधि योजना आणि पीएम विश्वकर्मा योजनांचे उदाहरण दिले. तसेच, याच सिद्धांताच्या माध्यातून लोकांना एलपीजी गॅसवरील अनुदान स्वेच्छेने सोडण्यास प्रोत्साहित केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. याआधी केंद्र सरकारच्या आर्थिक सर्वेक्षण 2019 च्या अहवालात देखील याचा उल्लेख करण्यात आला होता.
तुम्ही देखील नज सिद्धांत वापरून कशाप्रकारे योग्य आर्थिक निर्णय घेऊ शकता, हे समजून घेऊयात.
चांगल्या आर्थिक सवयींसाठी करा नज सिद्धांताचा वापर -
बचत ( Automatic Savings ) – बचत ही एकप्रकारे भविष्यातील आर्थिक आधार असते. तुम्ही जो पैसा आता खर्च न करता वाचवत आहात, त्याचा नक्कीच भविष्यात वापर होऊ शकतो. मात्र, आपण दीर्घकालीन विचार न करता कोणतीही बचत करत नाही व आपतकालीन स्थितीमध्ये समस्या निर्माण होते.
तुम्ही नज सिद्धांताच्या मदतीने योग्यप्रकारे बचत करू शकता. पगार झाल्यानंतर आपण किती रक्कम बचत करायची व किती खर्च करायचा, अशा गोंधळात असतो. परंतु, तुम्ही ऑटोमेटिक ट्रान्सफर सुविधेच्या माध्यातून दरमहिन्याला ठरविक रक्कम थेट बचत खात्यात जमा करू शकता. थोडक्यात, दरमहिन्याला पगारातील ठराविक रक्कम बचत करण्यासाठी नेहमी विचार करावा लागत नाही.
गुंतवणूक – तुम्ही गुंतवणुकीबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी नज सिद्धांत वापरू शकता. तुमचा आर्थिक उद्देश व निवृत्तीनंतरच्या योजनांच्या आधारे योग्य फंड्समध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे. अशा फंड्सची निवड करावी, जे तुमच्या आर्थिक उद्देशानुसार आपोआप गुंतवणुकीचे योग्य गोष्टीत विभाजन करून नुकसान टाळेल.
तुम्ही कमीत कमी पैशांसह गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या अॅप्सची मदत घेऊ शकता. तुम्ही तुमच्या दीर्घकालीन उद्देशांच्या लहान लहान टप्प्यात विभागणी करू शकता. गुंतवणुकीचे हे लहान लहान टप्पे पूर्ण होतात की नाही, याचा आढावा सातत्याने घेणे देखील गरजेचे आहे.
सुरुवातीलाच मोठी झेप घेणे शक्य न झाल्यास निराशा येते व अनेकजण गुंतवणूक करणे बंद करतात. त्यामुळे, लहान-लहान टप्पे पूर्ण करून करून तुम्ही मोठे उद्देश साध्य करू शकता. याशिवाय, अशा टूल्सचा वापर करा ज्याद्वारे पोर्टफोलिओमध्ये विविधता येईल.
खर्च – आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी अनावश्यक गोष्टींवरील खर्च कमी करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही आधीच खर्च व बचतीचे नियोजन करू शकता. यासाठी बजेटिंग अॅप्सची मदत घेतल्यास फायदा होऊ शकतो. या अॅप्सच्या मदतीने वेळेवर खर्च व गुंतवणुकीचे रिमाइंडर मिळते.
या अॅप्सच्या मदतीने गुंतवणुकीवर लक्ष ठेवण्यास देखील मदत होते. तुम्ही कोणत्या गोष्टीवर अनावश्यक खर्च होत आहे, त्याची यादी बनवू शकता. याशिवाय, बिल भरण्यासाठी ऑटोमेटिक पेमेंटचा पर्याय रद्द करा. यामुळे तुम्हाला दरमहिन्याला कोणत्या सेवांसाठी जास्त खर्च येत आहे ते लक्षात येईल व अशा सेवा बंद करता येतील.
कर्जाचे व्यवस्थापन – कर्जाचे हफ्ते फेडणे ही मोठी समस्या असते. प्रामुख्याने उत्पन्न कमी असल्यास हफ्ते फेडताना अनेक अडथळे येतात. मात्र, नज सिद्धांत वापरून तुम्ही वेळेवर, जबाबदारीने कर्ज फेडू शकता. अनावश्यक कर्जाच्या जाळ्यात अडकण्यापासून देखील वाचू शकता.
समजा, तुम्ही 50 हजार रुपये कर्ज घेतले आहे. अशावेळी तुम्ही दरमहिन्याला 2 हजार रुपयांचा हफ्ता भरू शकता. अनेकदा आपल्याला हफ्ता भरण्याची तारीख लक्षात राहत नाही व नंतर दंड भरावा लागतो. अशावेळी, ऑटोमेटिक लोन पेमेंटची सुविधा वापरल्यास कर्जाचे हफ्ते वेळेवर भरले जातील.
तुम्ही हफ्ते भरण्याच्या तारखेच्या 5 दिवसांच्याआधीचे रिमाइंडर देखील सेट करू शकता. यामुळे तुम्हाला हफ्त्याची आधीच माहिती मिळेल व तुम्ही पैशांची सोय करू शकाल. अशाप्रकारे, वेळेवर हफ्ते भरल्यास कर्ज लवकर फेडता येईल.
आर्थिक सवयी – नज सिद्धांतानुसार लोकांना जेव्हा दोन गोष्टींपैकी एकाची निवड करायची असते, अशावेळी भविष्यात फायदा होईल अशा गोष्टींऐवजी स्वतःसाठी सोयीस्कर व सोप्या गोष्टींची निवड करतात. अशावेळी नज सिद्धांताची फायदा योग्य गोष्ट निवडण्यास मदत होते. थोडक्यात, आर्थिक गोष्टींबाबत व्यक्तीची वर्तणूक स्पष्ट होते.
नज सिद्धांत हा तुम्हाला चांगल्या आर्थिक सवयी लागाव्यात यासाठी प्रोत्साहन देत असतो. याच्या मदतीने चांगल्या आर्थिक सवयी लागण्यास मदत मिळते. याद्वारे दरमहिन्याला आपोआप बचत, खर्चात कपात, आर्थिक नियोजन, गुंतवणूक अशा चांगल्या आर्थिक निवडीसाठी स्वतःला प्रोत्साहन देऊ शकतो.
नज सिद्धांताचे तोटे
नज सिद्धांताचा वापर तुम्ही चांगल्या आर्थिक गोष्टींची निवड करण्यासाठी करू शकतात. मात्र, सिद्धांताच्याही काही मर्यादा आहेत. यामुळे प्रत्येक वेळेस फायदा होईलच असे नाही. हा सिद्धांत प्रत्येकासाठीच काम करेल असे नाही. कारण प्रत्येकाचे आर्थिक उद्दिष्ट, निवड करण्याची क्षमता वेगवेगळी असते. अशात योग्य आर्थिक निवड करताना विविध गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे.
आपण नज सिद्धांताचा वापर करून लहान लहान आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पण याच वेळी संभाव्य परिणामांकडे दुर्लक्ष केल्यास तोटा होण्याची शक्यता असते.
थोडक्यात, नज सिद्धांत आर्थिक उद्देश साध्य करण्यासाठीचे उत्तम माध्यम आहे. मात्र याचा योग्यप्रकारे वापर केला तरच फायदा मिळू शकतो. योग्य आर्थिक उद्दिष्ट व सातत्याने असणे गरजेचे आहे. एकप्रकारे, उद्याच्या भविष्यासाठी तुम्हाला वर्तमानकाळातील स्वतःला सातत्याने प्रोत्साहन ( Nudge) द्यावे लागेल. तरच तुम्ही दीर्घकालीन आर्थिक यश मिळवू शकता.