अपारंपारिक उर्जा निर्मितीमध्ये एनटीपीसी या सरकारी कंपनीने विक्रमी कामगिरी केली आहे. एनटीपीसीने अपारंपारिक उर्जेचा (Renewable Energy) 1 गिगावॅट निर्मितीचा टप्पा नुकताच पूर्ण केला. अपारंपारिक उर्जा निर्मिती क्षमतेत 1075 मेगावॅटची वाढ झाल्याचे एनटीपीसीने म्हटले आहे.
बिगर इंधन उर्जा निर्मितीची क्षमता 9.41% इतकी वाढली आहे. ज्यात 58041.27 मेगावॅट प्रकल्प क्षमता आहे. नुकताच राजस्थानमधील जैसलमेर येथे एनटीपीसीचा 240 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. त्याशिवाय देविकोट येथील 150 मेगावॅट आणि 90 मेगावॅटचा प्रकल्प देखील सुरु करण्यात आल्याचे एनटीपीसीने शेअर बाजाराला कळवले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी उर्जा निर्मिती कंपनी म्हणून एनटीपीसीची ओळख आहे. कंपनीकडून वीज निर्मिती आणि पारेषण करण्यात येते. कंपनीकडून तेल आणि वायू उत्खनन, कोळसा खाण व्यवसायात आहे. एनटीपीसीची एकूण उर्जा क्षमता 67907 मेगावॅट इतकी आहे. दरम्यान एनटीपीसीने अपारंपारिक उर्जा व्यवसाय नव्या कंपनीमध्ये हस्तांतर करण्याचे ठरवले आहे. अपारंपारिक उर्जा व्यवसायाची संपूर्ण मालमत्ता एनटीपीसी ग्रीन एनर्जी या कंपनीमध्ये हस्तांतरित केली जाणार आहे.