येत्या 31 जुलै पर्यंत सर्वांनी आयकर भरायला हवा. आयकर भरण्याचे अनेक फायदे आहेत. तुमचे करप्राप्त उत्पन्न शून्य जरी असले तरीही तुम्ही आयकर भरू शकता आणि वेगवगेळ्या व्यवहारात कमाईपेक्षा अधिक कर भरला असेल तर तुमचे पैसे ‘रिबेट’ स्वरूपात तुम्हांला परत देखील मिळतात. तेव्हा एक सुजाण आणि सजग नागरिक म्हणून प्रत्येक कमावत्या व्यक्तीने कर भरायला हवा.
नागरिकांना कर भरणे ही अजूनही एक अवघड प्रक्रिया वाटते. त्यात काही चूक झाली तर उगाच दंडात्मक कारवाई होईल असा काहींचा समज आहे. याच सगळ्या पार्श्वभूमीवर डिजिटल पेमेंट आणि आर्थिक तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म फोनपेने (PhonePe) त्यांच्या ॲपद्वारे ग्राहकांना आयकर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. PhonePe ने याबाबत जारी केलेल्या निवेदनात याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. फोनपे च्या निवेदनात म्हटले आहे की, वैयक्तिक आयकरदाते आणि व्यवसायिक करदाते त्यांचा कर फोनपे च्या मदतीने भरू शकतात.
Digital payments and fintech platform PhonePe on Monday launched a feature to pay income tax through its app.
— Transcontinental Times (@Transctimes) July 25, 2023
Individuals and businesses can pay self-assessment and advance tax through UPI or credit card via the application, without logging into the income tax portal, PhonePe… pic.twitter.com/qXKjjPFJRA
ॲपवर हे खास फीचर ॲड करण्यात आले असल्याचे कंपनीने म्हटले आहे. आयकर भरणाऱ्यांना स्वतंत्रपणे आयकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन कर भरण्याची आवश्यकता नसेल. थेट UPI पेमेंटचा वापर करून युजर्स कर भरणा करू शकतील. दोन दिवसांत कर रक्कम टॅक्स पोर्टलवर भरली जाईल अशी माहिती देखील देण्यात आली आहे.
तपशील द्यावा लागेल
ज्या फोनपे युजर्सला कर भरणा करायचा असेल त्यांना ॲपमध्ये लॉग इन करून आणि 'इन्कम टॅक्स' हा पर्याय निवडावा लागेल. यात युजर्सला त्यांची आवश्यक ती माहिती द्यावी लागेल. जसे की, कर प्रकार, कर मुल्यांकन वर्ष, पॅन कार्ड तपशील इत्यादी. त्यानंतर करदाते त्यांच्या करप्राप्त उत्पन्नाचे विवरण बघू शकतील. हा कर भरण्यासाठी ग्राहकांना UPI पेमेंट हा ऑप्शन निवडता येईल. कर भरणा झाल्यानंतर करदात्याला युनिक ट्रान्झॅक्शन नंबर (Unique Transaction Number) मिळेल.
युजर्सने हे लक्षात घ्यायला हवे की फोनपे वरून केवळ कर भरणा करता येईल, ITR विवरण भरता येणार नाहीये. ITR साठी युजर्सला आयकर विभागाच्या पोर्टलवरच जावे लागणार आहे.