साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये शेवटची सेमिस्टर सुरू झाल्यावर कॅम्पस मुलाखतींना सुरुवात होते. कंपन्यांमध्येही याच सुमारास दिवाळीचा सण संपून पुन्हा कामाची लगबग सुरू झालेली असते. हाच आहे कॉर्पोरेच क्षेत्रातला सुगीचा हंगाम. त्यानुसार, यंदाही देशात नोकरभरतीचा महिन्याचा विकासदर 43% इतका घसघशीत आहे. आणि ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये 27% जास्त नोकऱ्या लोकांना मिळाल्यात.
हे चित्र जरी आश्वासक असलं तरी सगळ्याच क्षेत्रांत नोकरभरती सुरू आहे असं नाही. आणि विशेष म्हणजे माहिती-तंत्रज्ञान या एरवी जोरात असलेल्या क्षेत्रात नोव्हेंबर महिन्यात आधीच्या तुलनेत कमी नोकर भरती झाली आहे. काय आहे देशातला नोकर भरतीचा मूड समजून घेऊया…
कुठल्या क्षेत्रात आहेत नोकरीच्या सर्वाधिक संधी?
केंद्रीय श्रम मंत्रालय दर तिमाहीला नोकर भरतीची आकडेवारी प्रसिद्ध करत असतं. आणि EPFO कार्यालयाकडे जमा होणारा डेटा यासाठी विचारात घेतला जातो. 2022च्या तिसऱ्या तिमाहीचा म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर 2022चा ट्रेंड बघितला तर सलग दुसऱ्या तिमाहीत इन्श्युरन्स म्हणजे विमा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकर भरती झाली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये नोकर भरतीचं प्रमाण 42% नी जास्त आहे. त्या खालोखाल नंबर लागतो तो बँकिंग आणि रिअल इस्टेट क्षेत्राचा. तेल उद्योग, पर्यटन आणि ऑटो क्षेत्रानेही कुशल कामगारांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या देऊ केल्या आहेत.
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राबरोबरच फार्मा, दूरसंचार, एड्यु-टेक आणि बीपीओ क्षेत्राने मात्र आहे ते कर्मचारी कमी करण्याचंच धोरण सध्या ठेवलंय.
कुठल्या शहरांत नोकरीच्या सर्वाधिक संधी?
या ट्रेंडमध्ये मात्र फारसा फरक पडलेला नाही. पूर्वीप्रमाणेच मेट्रो शहरांमध्ये नोकर भरतीचा ओघ जास्त आहे. दिल्लीमध्ये आधीच्या महिन्याच्या तुलनेत 20% जास्त नोकर भरती झाली आहे. तर पाठोपाठ मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या शहरांचा नंबर लागतो. दुसऱ्या स्तरावर येणाऱ्या पुणे, हैदराबाद या शहरात नोकर भरतीचा ओघ तुलनेनं कमी झाला आहे.
याचं एक कारण, या शहरांमध्ये माहिती-तंत्रज्ञान कंपन्या मोठ्या प्रमाणावर आहेत. आणि नेमकी तिथेच नोकर भरती कमी झाल्यामुळे यावर्षी तिथं नोकर भरतीचं प्रमाण या शहरांमध्ये कमी आहे. याउलट अहमदाबाद, बडोदा, चंदिगड, जयपूर आणि कोईमतूर या शहरांमधूनही नोकर भरतीचा कल दिसून आलाय.
अनुभवी आणि कुशल कामगारांची गरज वाढली
कोरोना काळात उद्योगधंद्यांकडे पैशाची चणचण होती. आणि ती कसर भरून काढण्यासाठी कंपन्यांनी मध्यम अनुभवी किंवा अनुभवी लोकांना प्रसंगी काढून टाकलं. आणि नुकते शिकून बाहेर पडलेल्या लोकांना नवीन नोकरीसाठी पसंती दिली. आता हा ट्रेंड बदलला आहे. नवीन आकडेवारीनुसार, 12 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या कुशल कामगारांची भरती 21%नी वाढली आहे. तर मध्यम अनुभवी म्हणजे 8 ते 12 वर्षांचा अनुभव असलेल्या लोकांची भरती 11%नी वाढली आहे.
या रोजगारविषयक अहवालानंतर निष्कर्ष काढताना श्रम मंत्रालयाने ही गोष्ट आवर्जून नमूद केली आहे. जागतिक बाजार मंदीत असताना भारतीय कंपन्यांची कामगिरी तुलनेनं चांगली आहे. पण, कोरोना नंतर सगळ्याच क्षेत्रांमध्ये अजून सकारात्मकता आलेली नाही. खासकरून भारतीय स्टार्ट अप यावर्षी आस्तेकदम वाटचाल करण्याच्या मनस्थितीत आहेत, असं या अहवालात म्हटलंय.