अवकाळी पावसामुळे (Unseasonal rain) सध्या विविध व्यवसायांचं नियोजन बिघडल्याचं दिसतंय. शेतीचं नुकसान तर झालंच. सोबत शीतपेयांपासून आइस्क्रीमपर्यंतच्या (Ice cream) विक्रीत जवळपास 38 टक्के घट झालीय. यंदाच्या उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच उत्तर भारतासह देशातल्या विविध राज्यांत थंड पेय, आईस्क्रीम, एसी (Air Conditioner) आणि कुलरचा (Cooler) व्यवसाय थंडावल्याचं दिसून आलं. आता जून सुरू झालाय. काही दिवसांतच मॉन्सूनचं (Monsoon) आगमन होईल. मात्र तत्पूर्वी देशभरात यंदा अवकाळीनं हजेरी लावली. त्यात प्रचंड नुकसान सर्वसामान्यांसह व्यावसायिकांना सोसावं लागलं. अवकाळी पावसामुळे शीतपेय, थंडावा देणारे एसी, कुलर या गोष्टींपासून यंदा लोक काही अंतरावरच पाहायला मिळाले. परिणामी या वस्तूंच्या विक्रीत मोठी घट झाली. पावसामुळे वातावरणात गारवा असल्यानं या थंडीमुळे सर्वसामान्यांना या गोष्टींची गरजच भासली नाही. त्यामुळे आता कंपन्यांनीही वस्तूंचं उत्पादन कमी केलंय. टीव्ही 9नं हे वृत्त दिलंय.
Table of contents [Show]
आगामी काळात मागणीत वाढ होण्याची अपेक्षा
खरं तर आईस्क्रीम कंपन्या आणि व्यावसायिकांसाठी हा काळ सर्वात व्यस्त असतो. मात्र 2017पासून आतापर्यंतच्या व्यवसायाचा विचार केल्यास यंदाचा उन्हाळा फारसा सकारात्मक राहिला नाही. मार्च ते मे या कालावधीत आईस्क्रीमच्या विक्रीत 38 टक्क्यांपर्यंत घट झाल्याचं पाहायला मिळालंय. मॉन्सूनच्या पावसाला लवकरच सुरुवात होणार आहे. मात्र, येत्या काळात उष्णता वाढेल आणि शीतपेय, आईस्क्रीमची मागणी त्या पार्श्वभूमीवर वाढेल, असा कंपन्यांना विश्वास आहे.
उत्पादनाच्या तुलनेत वस्तुंची विक्री नाही
सध्याची नेमकी परिस्थिती काय, यावर गोदरेज इलेक्ट्रॉनिकचे बिझनेस हेड कमल नंदी यांनी सांगितलं, की भारतातल्या बहुतांश भागात अवकाळी पाऊस झाला. विशेषत: उत्तर भारतात. हा पाऊस अनेक वर्षांमधला खरं तर सर्वात वाईट उन्हाळा आहे. कारण उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच कंपन्यांनी एसी, कुलर अशा थंडावा देणाऱ्या वस्तुंचं उत्पादन सुरू केलं. पण उत्पादनाच्या तुलनेत वस्तुंची विक्री होऊ शकली नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
एसीच्या खरेदीत 35 टक्क्यांची घट
येत्या काळात या वस्तुंना मागणी वाढेल, अशी गोदरेज इलेक्ट्रॉनिक्सला आशा आहे. सध्या, कंपन्या त्यांचं उत्पादन सुमारे 30 टक्के कमी करताना दिसत आहेत. फक्त मे महिन्यात एसीच्या खरेदीत 35 टक्क्यांची घट झालीय. येत्या काळात एसीची मागणी वाढण्याची अपेक्षा या कंपन्यांनी व्यक्त केलीय.
बिझोमचा डेटा
बेमोसमी पावसाचा फटका एसी, कुलर कंपन्यांनाच नाही तर शीतपेयं आणि आईस्क्रीम व्यवसायालाही बसला. बिझोम (Bizom) हा एक रिटेल इंटेलिजेंस प्लॅटफॉर्म आहे. बाजारात कोल्ड्रिंक्स आणि आइस्क्रीमच्या विक्रीचा डेटा या कंपनीमार्फत मॅनेज केला जातो. या कंपनीच्या आकडेवारीनुसार, मार्च ते मे दरम्यान शीतपेयांच्या विक्रीत 25 टक्के घट झालीय. दुसरीकडे, आईस्क्रीमच्या विक्रीबद्दल बोलायचं झाल्यास मार्च ते मे दरम्यान सुमारे 38 टक्के घट नोंदवली गेल्याचं या डेटामध्ये नमूद आहे. साबण खरेदीतही 8 टक्क्यांची किरकोळ घट नोंदवण्यात आलीय.