Wheat crop loss: यंदा रब्बी हंगामात गव्हाचे उत्पादन दिलासादायक होण्याचा अंदाज वर्तवला जात असला तरी खराब हवामानामुळे 10 ते 20 लाख टन गव्हाचे नुकसान होऊ शकते, असे सरकारने म्हटले आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, उष्णतेच्या लाटा आणि वादळी पावसामुळे अनेक राज्यात गव्हाचे पिक सपाट झाले किंवा तयार गव्हाची गुणवत्ता, चमक कमी झाली. (Wheat Production in India) मागील वर्षी रब्बी हंगामात उत्पादन कमी झाल्याने गव्हाचा तुटवडा निर्माण झाला होता. या वर्षी उत्पादन चांगले झाल्याने किरकोळ बाजारातील गव्हाच्या किंमती खाली येण्याची शक्यता आहे.
केंद्रीय गोदामे अर्धी रिकामी (Govt Wheat Stock reduced)
चालू रब्बी हंगामात सुमारे 112 मिलियन टन गव्हाचे उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे एक समाधानकारक उत्पन्न असेल. मागील वर्षी गव्हाचा तुटवडा भासू लागल्याने केंद्रीय गोदामातील गहू खुल्या बाजारात विक्री करण्यात आला होता. त्यामुळे सरकारी गोदामे निम्म्याने खाली आहेत. राज्य सरकारे आणि थेट शेतकऱ्यांकडून गहू विकत घेऊन गोदामांमध्ये साठवण्यास सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत 7 लाख टन गहू सरकारने विकत घेतला आहे.
निर्यात निर्बंध उठवण्यास नकार (Ban on Wheat Export)
मिल उद्योगांकडून दरवर्षी राज्यातील गोदामांतून गहू विकत घेतला जातो. मात्र, ओपन मार्केट सेल्स स्कीमद्वारे थेट शेतकऱ्यांकडून गहू खरेदी करण्याचे आवाहन सरकारने मिल उद्योगांना केले आहे. गहू निर्यातीवरील निर्बंध सरकारने उठवावे अशी मागणी होत आहे. मात्र, देशांतर्गत दरवाढीची भीती लक्षात घेता, सरकारने निर्यातीवरील निर्बंध उठवण्यास नकार दिला आहे. मागील रब्बी हंगामाच्या तुलनेत या वर्षी 5 मिलियन टन गव्हाचे जास्त उत्पादन होईल, असे बोलले जात आहे.
2022 च्या रब्बी हंगामात देशात 97.7 मिलियन टन गव्हाचे उत्पादन झाले आहे. उत्तर भारतातील उष्णतेच्या लाटांमुळे गहू पिकाचे मोठे नुकसान झाले. यार्षीही खराब हवामानाचा फटका बसला. अॅग्रीवॉचने चालू रब्बी हंगामात गव्हाचे उत्पादन 104.24 मिलियन टन होईल असा अंदाज वर्तवला आहे. खराब हवामानामुळे यात घट होऊ शकते, असे नंतर म्हटले.
किरकोळ बाजारातील गव्हाच्या किंमती (Wheat price in retail market)
सध्या बाजारात नवा गहू येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे काही प्रमाणात दर कमी होत आहेत. सहा महिन्यांपूर्वी चांगल्या प्रजातीच्या गव्हाचे दर प्रती क्विंटल 3500 च्या पुढे गेले होते. मात्र, नवा गहू बाजात आल्याने किरकोळ बाजारातील दर कमी होऊ शकतात. अद्याप रब्बी हंमागातील गव्हाची कापणी पूर्ण झालेली नाही. येत्या दोन महिन्यांत दर कमी होऊ शकतात. गव्हाचे दर खाली आल्यानंतर बेकरी उत्पादने, बिस्किट, ब्रेड आणि इतर गव्हाची उत्पादनेही स्वस्त होऊ शकतात. मिल मालकांनी मागील सहा महिन्यात चढ्या दराने गहू विकत घेतल्याने पीठाचे दर वाढले होते. परिणामी बेकरी उत्पादने महाग झाली आहेत.