Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SBI MODS : एफडी मोडावी लागणार नाही अन् दंडही नाही, काय आहे एसबीआयचा खास प्लॅन? जाणून घ्या...

SBI MODS : एफडी मोडावी लागणार नाही अन् दंडही नाही, काय आहे एसबीआयचा खास प्लॅन? जाणून घ्या...

SBI MODS : आर्थिक अडचणीत असताना आता तुम्हाला तुमची एफडी मोडण्याची गरज नाही. तुम्हाला कोणता दंडदेखील भरायची गरज नाही. कारण स्टेट बँक ऑफ इंडिया घेऊन आलीय एक खास योजना. त्यामुळे एटीएममध्ये तुम्हाला पैसे काढताना कोणता विचार करायची गरज पडणार नाही.

मुदत ठेव म्हणजेच एफडीमध्ये (Fixed deposit) ठराविक कालावधीनंतर परताव्याची हमी असते. त्यामुळे खरं तर गुंतवणुकीचे (Investment) विविध पर्याय असतानादेखील लोक एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत असतात. पण यात समजा तुम्ही मुदतपूर्तीपूर्वीच एफडी तोडली तर तुम्हाला दंड (Penalty) भरावा लागतो. मात्र आता यापासून वाचण्यासाठी पर्याय उपलब्ध झालाय. एसबीआयचा एफडी प्लॅन काही खास आहे. या माध्यमातून तुम्हाल गरज असेल तेवढी रक्कम तुम्ही कधीही एटीएममधून काढू शकता. पैसे काढण्यासाठी तुम्हाला कोणताही दंड भरण्याची गरज पडणार नाही. तुमच्याकडे असलेल्या उर्वरित रकमेवरचं व्याजही चालूच राहणार आहे.

गरज असेल तेव्हा पैसे काढा

विविध सुविधा देणारी ही आहे एसबीआयची मल्टी ऑप्शन डिपॉझिट स्कीम (SBI Multi Option Deposit Scheme). या स्कीमनुसार तुम्हाला जेव्हा पैशांची गरज असेल तेव्हा तुम्ही एटीएममधून रक्कम काढू शकता. त्यासाठी दंड लागणार नाही. या योजनेनुसार ठेवीदाराला इतर एफडीप्रमाणेच व्याज मिळत असतं.

काय आहे एसबीआय मोड्स?

एसबीआयमध्ये कोणीही 10,000 रुपयांच्या गुंतवणुकीसह हे एफडी खातं उघडू शकतो. यात 1,000 रुपयांच्या पटीत पैसे जमा करता येतात. सोबतच केवळ 1,000 रुपयांच्या पटीत पैसे काढण्याची सुविधा देण्यात येते. ही मुदत ठेव योजना ठेवीदाराच्या बचत किंवा चालू खात्याशी जोडण्यात आलेली आहे. ठेवीदारांना एटीएमद्वारे एफडीमधून आवश्यक रक्कम कधीही काढण्याची सुविधा यामार्फत देण्यात येते.

फायदे काय?

एसबीआय मोड्सचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजेच ज्यावेळी अचानक पैशांची गरज निर्माण होते, त्यावेळी एफडी तोडण्याचं किंवा दंड भरण्याचा ताण नसतो. पैशांची गरज असते त्यावेळी आर्थिक नियोजन काहीसं कोलमडतं. ते यामध्ये होण्याची शक्यता कमी असते. बचत किंवा चालू खात्याशी हे जोडलेलं असल्यानं एटीएममधून एफडीची रक्कम सहज काढता येत असते. 

पैसे काढण्याची मर्यादा नाही

मुदत ठेवीमधली सर्वच रक्कम काढणं गरजेचं नाही. जेवढी आवश्यकता असेल तेवढी रक्कम काढता येवू शकते. उरलेली रक्कम जमा करून ठेवता येईल. तुमच्याकडे असलेल्या उर्वरित रकमेवर व्याज मिळत राहणार आहे. यासोबतच केवळ एकदाच पैसे काढण्याची सुविधा दिली जातेय असं नाही. साधारणपणे 1000 रुपयांच्या पटीत कितीही वेळा पैसे काढू शकता. त्याला मर्यादा ठेवण्यात आलेली नाही.

कर्ज सुविधा उपलब्ध

इतर मुदत ठेवींप्रमाणे एसबीआय मोड्सच्या खात्यावर कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याशिवाय खातं दुसऱ्या शाखेत हस्तांतरित करण्याची परवानगीदेखील देण्यात आली आहे. पण यात एक बाब महत्त्वाची आहे, ती म्हणजे या खात्याशी जोडलेल्या बचत खात्यामध्ये किमान मासिक सरासरी शिल्लक राखणं गरजेचं आहे. तुम्हालाही एसबीआयच्या या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल, तर खातं ऑनलाइन उघडता येवू शकतं. तसंच जवळच्या कोणत्याही शाखेत जाऊन तुम्ही ते उघडू शकता. एसबीआय मोड्स खातं किमान 1 वर्ष आणि कमाल 5 वर्षांसाठी उघडता येतं. यामध्ये जे व्याज मिळतं, ते करपात्र आहे. तुम्हाला त्या व्याजावर कर भरावा लागतो.