हिंडनबर्ग अहवाल, अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर कोसळणे, त्यानंतर अदानी ग्रुपकडून कायदेशीर कार्यवाहीबाबत सांगितले जाणे, या सगळ्या घडामोडी गेले 2 दिवस वेगाने घडत आहेत. यात आता MSCI ने हिंडनबर्ग अहवालावर मागवलेला अभिप्राय ही देखील एक महत्वाची बातमी आहे. असे म्हणण्याचे कारण काय ते समजून घेण्यासाठी आधी MSCI काय आहे ते समजून घेणे आवश्यक आहे.
MSCI काय आहे ?
MSCI हे Morgan Stanley Capital International चे संक्षिप्त रूप आहे. ही एक गुंतवणूक संशोधन संस्था आहे जी स्टॉक इंडेक्सेस, पोर्टफोलिओ जोखीम आणि परफॉर्मन्स विश्लेषण आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांना आणि हेज फंडांना गव्हर्नन्स टूल्स प्रोवाईड करते. आणि अदानी विल्मार वगळता अदानी समूहाचे सर्व समभाग MSCI ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्स आणि FTSE निर्देशांकात आहेत. यामुळे आता यावर अदानी समूहाची भूमिका पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
MSCI ने शनिवारी(28 जानेवारी) यावर असे सांगितले की, ते अदानी समूह आणि संबंधित सिक्युरिटीजवर अभिप्राय जाणून घेत आहे. तसेच, शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने जारी केलेल्या अहवालाची tत्यांना माहिती आहे, असे रॉयटर्सच्या अहवालात म्हटले आहे. तसेच MSCI ग्लोबल इन्व्हेस्टेबल मार्केट इंडेक्सेससाठी त्या संबंधित सिक्युरिटीजच्या पात्रतेवर परिणाम करू शकणार्या परिस्थिती आणि घटकांसंबंधी सार्वजनिकरित्या उपलब्ध माहितीचे बारकाईने निरीक्षण करत आहे," असे एका निवेदनात म्हटले आहे.
अदानी विल्मार वगळता अदानी समूहाचे सर्व समभाग MSCI ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्स आणि FTSE निर्देशांकात आहेत. अदानी एंट, अदानी पोर्ट्स, अदानी ट्रान्स, अदानी टोटल गॅस, अदानी पॉवर, एसीसी, अंबुजा आणि अदानी ग्रीन हे एमएससीआय स्टँडर्ड इंडेक्स आणि एफटीएसई वर्ल्ड इंडेक्समध्ये आहेत. यूएस-स्थित शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने बुधवारी एक अहवाल प्रसिद्ध केला ज्यामध्ये अदानी समूहावर बाजारातील हेराफेरी आणि अकाउंटिंग फसवणुकीचा आरोप आहे. यामुळे बुधवारी घबराटीतून विक्री झाली ज्यामुळे अदानी समूहाच्या सात सूचीबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल सुमारे 1 लाख कोटी रुपयांनी कमी झाले.
अदानी समूहाकडून कायदेशीर कारवाईचा इशारा
हिंडेनबर्ग अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर, अदानी समूहाने गुरुवारी यावर प्रत्युत्तर दिले. हिंडेनबर्ग अहवालाचा शेअरधारक आणि गुंतवणूकदारांवर नकारात्मक परिणाम झाल्याचे तसेच अदानी समूहाचे लीग प्रमुख जतीन जलुंधवाला यांनी या अहवालामुळे भारतीय शेअर बाजारातील अस्थिरता ही चिंतेची बाब असल्याचे म्हटले होते.अदानी समूहाच्या शेअर्सच्या घसरणीचा फायदा शॉर्ट सेलर हिंडेनबर्गला होईल, असेही त्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. अदानी समूहाने हिंडेनबर्गच्या दिशाभूल करणाऱ्या अहवालाबद्दल कायदेशीर कारवाई करणार असल्याचे देखील म्हटले आहे.
अदानी समूहाने म्हटले आहे की, “हिंडेनबर्ग रिसर्चने 24 जानेवारी 2023 रोजी प्रकाशित केलेला अहवाल दुर्भावनापूर्ण आणि खोडकर असून हे कोणतेही संशोधन न करता तयार करण्यात आले आहे. या दिशाभूल करणाऱ्या अहवालाचा अदानी समूह, आमचे भागधारक आणि गुंतवणूकदारांवर विपरीत परिणाम झाल्याची भूमिकाही अदानी समूहाकडून घेण्यात आली होती. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतींवर घातक परिणाम होण्यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे, अशीही भूमिका यावेळी घेण्यात आली होती.