सोशल मिडियावर YouTube, Instagram किंवा Facebook च्या माध्यमातून भरमसाठ कमाई करणाऱ्या इन्फ्ल्युन्सरकडून मिळालेले उत्पन्न लपवले जात आहे. तर दुसरीकडे यातील बऱ्याच जणांना टॅक्सच्या कायद्याचे नियम माहित नसल्यामुळे त्यांच्यावर इन्कम टॅक्स विभागाची वक्र दृष्टी पडली आहे.
इन्कम टॅक्स विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी सोशल मिडियावरील इन्फ्ल्युन्सरवर केलेल्या कारवाईत, त्यांना मिळालेले उत्पन्न, एकूण खर्च आणि नफा यांचा मेळ बसत नसल्याचे दिसून आले आहे. याबाबत मागील आठवड्यात केरळमधील 10 ते 12 युट्यूबर्स आणि इतर सोशल मिडियावरील इन्फ्ल्युन्सर्सना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
इन्कम टॅक्स विभागाने केलेल्या कारवाईत आणि डेटा अॅनालिटिक्समध्ये केलेल्या तपासणीत असे आढळून आले आहे की, सोशल मिडियातील विविध प्लॅटफॉर्मवर कार्यरत असलेले हे तरुण चांगले पैसे कमावत आहेत. यामध्ये ज्यांचे युझर्स आणि फॉलोवर्स जास्त आहेत. त्यांना प्रत्येक महिन्याला लाखो रुपये मिळत आहेत. पण हे पैसे या तरुणांकडून इन्कमट टॅक्स रिटर्न भरताना दाखवले जात नसल्याचे दिसून आले आहे. काही जणांना याबाबत पुरेशी माहिती नाही. पण काही जण जाणीवपूर्वक ही माहिती आयटीआरमध्ये दाखवत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अशा इन्फ्ल्युन्सवर नजर ठेवली जात आहे. तर काहींना नोटीस सुद्धा पाठवली जात आहे.
देशभरातील इन्फ्ल्युन्सवर राहणार नजर
सोशल मिडियावर अॅक्टीव्ह असलेल्या देशातील इतर भागातील इन्फ्ल्युन्सरची यादी इन्कम टॅक्स विभागाने काढली आहे. त्यांचीही अशाच पद्धतीने चौकशी केली जाणार आहे. नोटीस पाठवली जाणार आहे. यामध्ये सोशल मिडिया अॅक्टीव्हिस्ट बरोबरच काही सेलिब्रेटीदेखील आहेत.
जाहिराती, पोस्टच्या माध्यमातूनही लाखोंची कमाई
इन्फ्ल्युन्सर्सना सोशल मिडिया व्यतिरिक्त वेगवेगळ्या ब्रॅण्ड आणि कंपन्यांकडून इन्स्टाग्राम किंवा युट्यूबवरील पोस्ट, जाहिरातीसाठी 50 हजार ते 1 लाख रुपये दिले जात आहेत. अशा एका इन्फ्ल्युन्सची चौकशी केली असता त्याला वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून 30 लाख रुपये मिळाले होते. पण त्याने फक्त 3.5 लाख रुपये मिळाल्याचे दाखवले. यावरून इन्कम टॅक्स विभागाने अशा लोकांवरील आपले लक्ष केंद्रीत केले आहे.
सोशल मिडियावरील बाजार 900 कोटींचा
सोशल मिडियावर अॅक्टीव्ह असलेल्या इन्फ्ल्युन्सर्सना मार्केटमधून 900 कोटी रुपये मिळत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होणार असून 2025 पर्यंत तो 2,200 कोटी रुपयांपर्यंत पोहचू शकतो.