वाडिया ग्रुपच्या 'गो फर्स्ट' या विमान कंपनीने सादर केलेली दिवाळखोरीची याचिका राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने (NCLT) दाखल करुन घेतली आहे. लवादाने अभिलाष लाल यांची इंटरिम रिझोल्युशन प्रोफेशनल म्हणून नियुक्ती केली आहे. 'गो फर्स्ट'वर 6521 कोटींचे कर्ज आहे. आर्थिक चणचण असल्याने कंपनीने 19 मे 2023 पर्यंत विमान सेवा खंडीत केली आहे.
तब्बल 17 वर्ष सेवा दिल्यानंतर 'गो फर्स्ट' आर्थिक संकटात सापडली. 'गो फर्स्ट' एअरलाईन्सने 2 मे 2023 रोजी दिवाळखोरीची प्रक्रिया सुरु करणार असल्याचे जाहीर केले होते. यानंतर हवाई क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. 'गो फर्स्ट'ने अचानक सर्वच सेवा रद्द केल्याने हजारो प्रवाशांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कंपनीना प्रवाशांचे तिकिटाचे पैसे परत करण्याचे आदेश नागरी हवाई वाहतूक महासंचनालयाने दिले आहेत. जवळपास 350 कोटींची तजवजी कंपनीला करावी लागणार आहे.
निम्म्याहून अधिक नादुरुस्त विमाने आणि दैनंदिन खर्चासाठी पैसेच उरले नसल्याने 'गो फर्स्ट 'वर सेवा रद्द केल्याची मुदत तिसऱ्यांदा वाढवावी लागली आहे. आता 19 मे 2023 पर्यंत डोमेस्टीक आणि इंटरनॅशनल अशा सर्वच फ्लाईट्स रद्द करण्यात आल्याचे 'गो फर्स्ट'ने म्हटले आहे. या गोंधळाने हजारो प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागतोय. ऐन सुटीच्या हंगामात हा प्रकार घडल्याने तीन ते सहा महिने आगाऊ तिकिट बुक करणारे पर्यटक प्रचंड संतापले आहेत.याशिवाय टुरिझम कंपन्यांना देखील या गोंधळाने वेगळ्याच आर्थिक संकटात टाकले.
'गो फर्स्ट'वर बँकांची कर्जे , पुरवठादार आणि विमानांच्या भाड्यापोटी एकूण 11463 कोटींचे देणी आहेत. दिवाळखोरीच्या याचिकेनुसार कंपनीवर बँक ऑफ बडोदा 1300 कोटी, आयडीबीआय बँक 50 कोटी आणि सेंट्रल बँकेचे 2000 कोटींचे कर्ज आहे.
नेमकं काय घडले
एअर इंजिन्स निर्माती अमेरिकन कंपनी प्रॅट अॅंड व्हीटनी या कंपनीने दिलेली इंजिन्स नादुरस्त असल्याने 1 मे 2023 रोजी 'गो फर्स्ट'ला 25 विमाने वापरता आला नाहीत. याचा दैनंदिन सेवेला फटका बसला.'गो फर्स्ट एअर'ला रोजचे शेड्युल हाताळणे कठिण बनले. इंजिन्स शॉर्टेज हे काही आताचे कारण नाही तर मागील कित्येक महिने कंपनी या समस्येशी झगडत आहे. डिसेंबर 2022 या महिन्यात नादुरुस्त इंजिन्समुळे कंपनीच्या ताफ्यातील निम्मी विमाने पार्किंगमध्ये उभी करावी लागली होती. प्रॅट अॅंड व्हीटनी विरोधात 'गो फर्स्ट'ने अमेरिकेतील कोर्टात दाद मागितली होती. प्रॅट अॅंड व्हीटनीने इंजिन्स पुरवली तर कंपनी विमानांचा पूर्ण क्षमतेने वापर करेल, असा आग्रह 'गो फर्स्ट 'ने धरला होता. मात्र कोर्टात वेगळीच माहिती समोर आली. 'गो फर्स्ट'ने पैसे अदा करण्याचा दिलेला शब्द पाळला नसल्याचा दावा प्रॅट अॅंड व्हीटनी कंपनीने केला.पैसे वेळेवेर अदा न कल्याने नवीन इंजिन्स देण्यास नकार दिल्याचे प्रॅट अॅंड व्हीटनी कंपनीने म्हटले आहे.