सध्याच्या घडीला मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहायचा झालं तर एका व्यक्तीला किमान 200 ते 300 रुपये तिकिटांवर खर्च करावा लागतो. त्यात कुटुंबातील किंवा मित्रपरिवातील किमान 4-5 सदस्य असले तरी नुसत्या तिकिटावर तब्बल 1200 ते 1500 रुपये खर्च होतात. यावर मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने (Multiplex Association of India-MAI) सिनेमाप्रेमींसाठी एक गुड न्यूज दिली आहे.
राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त (National Cinema Day) सिनेमाप्रेमींना मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये फक्त 75 रुपयांत सिनेमा पाहता येणार आहे. 16 सप्टेंबर रोजी National Cinema Day आहे; यानिमित्ताने मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने (MAI) सर्व मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात 75 रुपयांत सिनेमा दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 16 सप्टेंबर रोजी देशातील सर्व थिएटरमध्ये फक्त 75 रुपयांत चित्रपट रसिकांना सिनेमा पाहायला मिळणार आहे. यामध्ये देशभरातील 4 हजारांहून अधिक स्क्रिन्स सहभागी होणार आहेत.
कधी आहे नॅशनल सिनेमा डे?
अमेरिकेमध्ये 3 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सिनेमा दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने तेथील सुमारे 3 हजार मल्टिप्लेक्स थिएटर्सनी 3 सप्टेंबर रोजी किमान 3 डॉलरमध्ये सिनेमा दाखवण्याची घोषणा केली. साधारणत: तिथल्या किमान तिकीटाची किंमत 9 डॉलर असते. याच धर्तीवर भारतातील मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने 16 सप्टेंबर रोजी देशातील चित्रपटगृहांमध्ये अवघ्या 75 रुपयांत सिनेमा दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात 16 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जातो.
देशभरातील 4 हजार स्क्रीन्सचा सहभाग
राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त आयोजित केलेल्या या इव्हेंटमध्ये देशातील PVR, INOX, Cinepolis, Carnival, Mirage and City Pride, Asian, Mukta A2, Movietime, Wave, M2K आणि Delight या मोठमोठ्या स्क्रीन्ससह देशभरातील सुमारे 4,000 स्क्रीन्स सहभागी होणार आहेत. या सर्व थिएटर्समध्ये 16 सप्टेंबरला 75 रुपयांत सिनेमाची तिकिटी विकली जाणार आहेत.
चित्रपट पाहण्यासाठी आमंत्रण!
मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने ट्विटरद्वारे याबाबतचे एक निवेदन प्रसिद्ध केले. यात असोसिएशनने म्हटले आहे की, राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्ताने सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आम्ही चित्रपटाद्वारे एकत्र आणणार आहोत. देशातील सर्व चित्रपटगृहे आता पुन्हा सुरू झाली आहेत. याचा आनंद व्यक्त करण्यासाठी आणि प्रेक्षकांचे आभार मानण्यासाठी आम्ही 75 रुपयांत सिनेमा ही संकल्पना राबवली आहे. जे अजूनही सिनेमा पाहण्यासाठी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात गेले नाहीत अशा सर्वांसाठी आमचे हे आमंत्रण आहे, असे असोसिएशनने म्हटले आहे.
मागील दोन वर्षात कोरोनामुळे सगळ्याच गोष्टींवर निर्बंध होते. लोकांना सण साजरे करता आले नाहीत की, आनंद व्यक्त करता आला नाही. पण आता ही परिस्थिती आटोक्यात आली आहे. त्यानिमित्ताने लोकांना पुन्हा एकदा उत्साहाने चित्रपटगृहांमध्ये येऊन सिनेमा पाहावा, यासाठी असोसिएशनने हा निर्णय घेतला.