2022 हे वर्ष शेअर बाजार, आयपीओ आणि या क्षेत्रातील गुंतवणूकदारांसाठी लाभदायक ठरले. सलग चैथ्या वर्षी हे गुंतवणूक माध्यम तेजीत राहिले. आयटी, एफएमसीजीसारखे अनेक सेक्टरमधील शेअरचे मूल्य वेगाने वाढल्याचे पाहायला मिळाले आहे. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एसआयपीची (SIP) लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. गेल्या वर्षी, म्हणजेच 2022 मध्ये म्युच्युअल फंड गुंतवणूकीत 2.2 लाख कोटींची भर पडली असल्याचे समोर आले आहे. म्युच्युअल फंडची शिखर संस्था असलेल्या Association of Mutual Funds in India (AMFI) ‘अम्फी’ने याबाबतची माहिती दिली आहे. 2022 अखेरीस एकूण 39.88 लाख कोटींची गुंतवणूक म्युच्युअल फंडमध्ये झाल्याचे नोंदवले गेले आहे. 2021 सालात देखील ही तेजी कायम होती. त्या वर्षात सुमारे 7 लाख कोटींची भर म्युच्युअल फंड गुंतवणूकीत पाहायला मिळाली होती.
म्युच्युअल फंडमध्ये भांडवली बाजारातील अनिश्चितता आणि बदलत्या व्याजदराचा परिणाम पाहायला मिळतो. याचा परिणाम थेट व्यवसायावर होत असतो. 2022 वर्षात उद्योग क्षेत्राची वाढ संथगतीने असतानाही गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडला पसंती दर्शवली आहे. नियोजनबद्ध गुंतवणुकीचा पर्याय असलेल्या एसआयपीकडे ग्राहक मोठ्या प्रमाणात वळले आहेत.
2022 वर्षात म्युच्युअल फंडमध्ये एकूण गुंतवणूक 71,443 कोटी रुपयांची पाहायला मिळाली. समभागसलंग्न योजनांमध्ये सर्वाधिक 1.61 लाख कोटी रुपये गुंतवले गेले आहेत. गुंतवणूकदारांची संख्या वर्षभरात दोन कोटींनी वाढून 14.11 कोटींवर पोहोचली आहे. एसआयपीच्या माध्यमातून विक्रमी अशा 13,000 कोटींची मासिक गुंतवणूक केल्याचे ‘अम्फी’ने म्हटले आहे. पगारदार नागरिकांमध्ये एसआयपीबद्दल, मासिक बचतीबद्दल जनजागृती करण्यास अम्फीला यश मिळत असल्याचे दिसते आहे.